CoronaVirus : 'पत्नी फोन करतेय, मुलगा रडतोय; मला सोडा हो' : थेट क्वारंटाईनमधून बातचीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 11:38 AM2020-04-13T11:38:10+5:302020-04-13T13:44:49+5:30
कोरोनाग्रस्तासोबत असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेला पुतण्या भावनिक
- सोमनाथ खताळ
बीड : मी कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलो, अशी अफवा सर्वत्र पसरली आहे. परंतु माझ्या चुलत्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलो होतो. माझा स्वॅब निगेटिव्ह आल्याने मन हलके झाले आहे. परंतु दोन दोन मिनिटाला पत्नी फोन करतेय, छोटा मुलगा रडत आहे. फोन करून नातेवाईकही विचारपूस करत आहेत. मला खुप मानसिक त्रास होतोय. मला सोडा हो, अशी भावना संस्थात्मक अलगिकरण (क्वारंटाईन) कक्षात असलेल्या कोरोनाग्रस्ताच्या पुतण्याने व्यक्त केली. यावेळी त्याला आश्रु अनावर झाले. हे सांगतान तो धायमोकलून रडत होता.
आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील दोघे जमातसाठी अहमदनगरला गेले होते. तेथेच त्यातील ६३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. कोरोनाग्रस्ताची दुचाकी सहकाऱ्याकडे होती. ३० मार्चला त्याचा सहकारी पिंपळ्याला आला. पुन्हा २ एप्रिलला ते दुचाकी घेऊन कोरोनाग्रस्ताला द्यायला गेले. या सहकाºयाला आणण्यासाठी कोरोनाग्रस्ताचा पुतण्या नगरला गेला. नंतर दोघेही दुपारच्यावेळी पिंपळ्याला आले. रात्रीच्या सुमारास कोरोनाग्रस्त व्यक्ती हा आपल्या दुचाकीवरून पत्नीसोबत पिंपळ्याला आले होते. ते बीडला आल्याचे समजताच दोघांनाही अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.
दरम्यान, कोरोनाग्रस्तासोबत आपलाच संपर्क आल्याची अफवा गावभर पसरली आहे. माझा संपर्क हा दुसऱ्या व्यक्तीसोबत आला होता. माझा स्वॅब घेतला, तो निगेटिव्ह आला आणि इथून पुढे मला क्वारंटाईन पण केले आहे. मला कोरोनाचे गांभीर्य आहे. परंतु गावात व तालुक्यात जी अफवा पसरली आहे, याचा मानसिक त्रास खुप होतोय. लोक फोन करून विचारत आहेत. चुकिची माहिती पसरत असल्याने कुटूंबाकडे पाहण्याचा दृष्टीकोण पण बदलला आहे, असेही क्वारंटाईनमधील व्यक्तीने सांगितले.
लोकांनो, घराबाहेर पडू नका...
मी सुश्क्षििात आहे. माझे गावात आपले सरकार केंद्र आहे. मला प्रशासनाच्या सुचनांची आणि कोरोनाचे पूर्ण गांभीर्य आहे. माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणून मी समाधानी आहे. परंतु स्वॅब घेतल्यापासून झोप नाही, की जेवण जात नव्हते. खुप त्रास होत होता. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातच सुरक्षित रहावे, असे आवाहनही या व्यक्तीने केले.
क्वारंटाईनपेक्षा अफवांचा त्रास होतोय...
मला रुग्णालयात आणले, स्वॅब घेतला हे सुरक्षेसाठी चांगलेच आहे. माझ्यासह सहा लोकांना क्वारंटाईन केले, याचाही जास्त त्रास नाही. परंतू लोकांनी मी कोरोनाग्रस्तासोबत संपर्कात आल्याची जी अफवा पसरविली याचा खुप त्रास होतोय. मीच नगरला जावून कोरोनाग्रस्ताला दुचाकीवर आणले, असेही फोन येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाग्रस्त व त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीच्या जवळून संपर्कात आलेल्या सहा लोकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले होते. त्यांचे स्वॅब निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना आता इन्स्टीट्यूशनल क्वारंटाईन केले आहे. तसेच अन्य ९ लोकांना आष्टीत क्वारंटाईन केलेले आहे. याचा कालावधी १४ दिवसांचा आहे.
- डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड