coronavirus : प्राध्यापिकेच्या संपर्कातील महिला आणि इतर पाच संशयित रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 07:27 PM2020-03-17T19:27:12+5:302020-03-17T19:33:55+5:30
सदर प्राध्यापिका ज्या शैक्षणिक संस्थेत कार्यरत आहेत, तेथील विद्यार्थी, कर्मचारी अशा ५०० जणांची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे.
औरंगाबाद : शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केलेल्या कोरोना पॉझिटिव्ह प्राध्यापिकेची प्रकृती स्थिर असून, आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू आहे. दुसरीकडे या प्राध्यापिकेच्या संपर्कातील ३६ वर्षीय महिलेला सोमवारी कोरोनाच्या संशयावरून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या महिलेचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला आहे. तसेच इतर पाच संशयित सुद्धा रुग्णालयात भरती झाले असून, त्यांचा अहवाल नेमका काय येतो, याकडे आरोग्य अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापिकेचा कोरोना तपासणीचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला आणि आरोग्य यंत्रणा कामाला लागली. या प्राध्यापिकेच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचा शोध घेऊन लक्षणांवरून संशयित रुग्णांचा शोध घेतला जात आहे. यामध्ये प्राध्यापिकेशी अगदी जवळून संपर्क आलेल्या महिलेला जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी आवश्यक ती तपासणी केल्यानंतर तपासणीसाठी महिलेचा स्वॅब पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) ला पाठविण्यात आला आहे. या महिलेच्या पतीचीही तपासणी करण्यात आली. परंतु त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.
घाटी आणि जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यापाठोपाठ सोमवारी ६२ वर्षीय महिलेचाही कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला. कोरोनासंदर्भात आतापर्यंत तिघांचा अहवाल निगेटिव्ह आला. तर एकाचा पॉझिटिव्ह आला. आता सोमवारी दाखल झालेल्या महिलेच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. ही महिला पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील असल्याने अहवाल नेमका काय येतो, याकडे आरोग्य अधिकाऱ्यांचे डोळे लागले आहेत. यासोबतच परदेशातून आणि शहराबाहेरील पाच जणांचे सुध्दा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
प्राध्यापिकेवर औषधोपचार सुरू
प्राध्यापक महिलेवर अॅन्टी रिट्रो व्हायरल थेरपी (एआरटी) उपचार करण्यात येत आहेत. आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार औषधोपचार केले जात आहेत. महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.
शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांची तपासणी
सदर प्राध्यापिका ज्या शैक्षणिक संस्थेत कार्यरत आहेत, तेथील विद्यार्थी, कर्मचारी अशा ५०० जणांची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे. कोणामध्येही लक्षणे दिसून आली नाहीत. ज्यांना काही त्रास होत असेल, त्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल होण्याचे आवाहन करण्यात आले. कोरोनाची लक्षणे निदर्शनास येण्यास १४ दिवसांचा कालावधी महत्त्वाचा ठरतो. प्राध्यापिका ५ मार्च रोजी संस्थेत गेल्या होत्या. त्यामुळे १९ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांनी वसतिगृहातून बाहेर पडू नये, अशीही सूचना करण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी घरी जाण्यासाठी तिकीट बुक केले होते. ही तिकीट रद्द करण्याचेही आदेश आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले. प्राध्यापिकेला कोरोना झाल्याचे समजताच संस्थेत स्वच्छतेपासून अनेक खबरदारी घेण्यात येत आहे. रुमाल, मास्क बांधूनच कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात आहे. याठिकाणी रुग्णवाहिका सज्ज ठेवल्याचेही पाहायला मिळाले.