coronavirus : चिंताजनक ! ‘हर्ड इम्युनिटी’पासून औरंगाबाद कोसो दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 04:48 PM2020-08-25T16:48:02+5:302020-08-25T16:52:01+5:30
आगामी कालावधीत रुग्णसंख्या आणखी झपाट्याने वाढण्याची भीती आहे.
औरंगाबाद : शहरातील १२ टक्के म्हणजेच १ लाख ७० हजार नागरिकांमध्ये कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती (अँटीबॉडीज) विकसित झाली; परंतु मुंबई, पुण्याच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे. ‘हर्ड इम्युनिटी’पासून औरंगाबाद कोसो दूर असल्याने कोरोनाचा धोका कायम असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली.
मुंबई महापालिकेने केलेल्या सेरो सर्वेक्षणामध्ये ५७ टक्के नागरिकांमध्ये कोरोनाविरोधातील अँटीबॉडी (प्रतिद्रव्ये) तयार झाल्याचे समोर आले होते, तर पुण्यातील ५० टक्के लोकांच्या शरीरात कोरोनाच्या अँटीबॉडीज सापडल्या. एखाद्या ठिकाणी ४० ते ७० टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी तयार होतात, त्यावेळी ‘हर्ड इम्युनिटी’ विकसित होते.
औरंगाबादेत १२ टक्के नागरिकांत अँटीबॉडी आढळून आल्या आहेत. प्राथमिक दृष्टीने ही बाब चांगली आहे; परंतु कोरोनाचा अद्यापही लांब पल्ला कायम असल्याचे हे संकेत आहेत. १२ टक्के नागरिकांत अँटीबॉडी आढळून आल्या. म्हणजे उर्वरित नागरिकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका कायम असल्याचे संकेत आहे. त्यामुळे आगामी कालावधीत रुग्णसंख्या आणखी झपाट्याने वाढण्याची भीती आहे.
शहरातील १.७० लाख जणांत प्रतिकारशक्ती #Aurangabad#coronavirushttps://t.co/f9HAAjrccW
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 25, 2020
किमान ५० टक्के प्रमाण हवे
किमान ५० टक्के नागरिकांमध्ये कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती (अँटीबॉडीज) विकसित झाली असती, तर हर्ड इम्युनिटी निर्माण झाली आहे. अजून तसे झालेले दिसत नाही. अँटीबॉडीजचे प्रमाण हे कमीच आहे.
- डॉ. प्रभाकर जिरवणकर, औषधवैद्यकशास्त्र विभाग, घाटी.
रुग्णसंख्या वाढणार
शहरात करण्यात आलेले सर्वेक्षण महत्त्वाचे आहे. हर्ड इम्युनिटीकडे जात आहोत, असे दिसते. अँटीबॉडीजचे प्रमाण पाहता आगामी कालावधीत रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर रुग्णांचे प्रमाण कमी होईल, असे दिसते.
- डॉ. आनंद निकाळजे, अतिदक्षता विभागतज्ज्ञ
धोका कायम
सेरो सर्वेक्षणावरून लक्षणे नसताना रुग्ण बरे होऊन गेल्याचे दिसते. हे एक चांगले लक्षण आहे. नागरिकांनी आपोआप कोरोनावर मात केल्याचे दिसते; परंतु अँटीबॉडीजचे प्रमाण पाहता कोरोनाचा धोका हा अजूनही कायम आहे. लस येईपर्यंत हीच स्थिती राहू शकते.
- डॉ. संतोष रंजलकर, अध्यक्ष, आयएमए
#coronavirus#Aurangabad यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून मृत्यूदर कमी होण्यास मदत होणार आहे.https://t.co/E7VERQ2XI6
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 25, 2020
सध्या ४३८० जणांवर उपचार सुरू आहेत https://t.co/9erZpx0V9y
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 25, 2020