coronavirus : एक्स-रेमधून कोरोनाचे होऊ शकते निदान?; घाटी रुग्णालयात अभ्यास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 04:54 PM2020-05-20T16:54:38+5:302020-05-20T16:56:45+5:30
एक्स-रेतून निदान होणे शक्य झाले, तर त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे या अभ्यासातून नेमके काय समोर येते, याकडे आता लक्ष लागले आहे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांचे एक्स-रेद्वारे निदान होऊ शकेल का आणि स्वॅब तपासणीला एक्स-रे पर्याय ठरू शकतो का, यासंदर्भात सध्या घाटीत क्ष-किरण विभागाकडून अभ्यास सुरू आहे. त्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि संशयित रुग्णांच्या ५५० एक्स-रेंचे विश्लेषण केले जात आहे.
घाटीत कोरोनाने बाधित तीव्र स्वरूपातील रुग्ण दाखल केले जात आहेत. त्यांच्यावरील उपचाराचे आव्हान घाटी पार पाडत आहे. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या रुग्णांवरील उपचारासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे. दिवसरात्र येथील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्यसेवक प्रयत्न करीत आहेत. उपचाराबरोबर घाटीत संशोधन कार्यही सुरू आहे.
कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीतून सदर रुग्ण पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, याचे निदान केले जात आहे. स्वॅब तपासणीसह रुग्णालयात दाखल होणाऱ्या संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णाच्या छातीचा एक्स-रे काढला जातो. एक्स-रेतून रुग्णाच्या फुफ्फुसात झालेले बदल, निमोनिया आणि कोरोनाच्या विषाणूमुळे झालेल्या संसर्गाची तपासणी केली जाते. याच एक्स-रेचा आधार घेऊन क्ष-किरण विभागाकडून एक अभ्यास केला जात आहे. घाटीत कोरोना पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि संशयित रुग्णांच्या ५५० एक्स-रेच्या सहाय्याने हा अभ्यास केला जात आहे. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि संशयित रुग्णांच्या एक्स-रेत नेमका काय फरक होता, त्यातून नेमके काय समोर आले आणि रुग्णाच्या उपचारासाठी एक्स-रेचा कितपत फायदा झाला, याचे विश्लेषण केले जात आहे. त्यासोबतच स्वॅबऐवजी एक्स-रेतून कोरोनाचे निदान होऊ शकते का, याचाही अभ्यास केला जात आहे.
...तर होईल फायदा
एक्स-रेची सुविधा ही जागोजागी उपलब्ध असते. सध्या कोरोनाच्या संशयित रुग्णांचे निदान वाढावे, कोणीही पॉझिटिव्ह रुग्ण तपासणीपासून दूर राहू नये, यासाठी सर्वत्र प्रयत्न केला जात आहे. एक्स-रेतून निदान होणे शक्य झाले, तर त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे या अभ्यासातून नेमके काय समोर येते, याकडे आता लक्ष लागले आहे.
विश्लेषणातून होईल स्पष्ट
एक्स-रे हा स्वॅबला पर्याय ठरू शकतो, हे सध्यातरी म्हणता येणार नाही. कारण अद्याप ते शास्त्रोक्त नाही. मात्र, सध्या ५५० एक्स-रेंचा अभ्यास केला जात आहे. त्यातून किती फायदा झाला, एक्स-रेतून काय समोर आले, एक्स-रे स्वॅबला पर्याय होऊ शकेल का, हे या एक्स-रेंच्या विश्लेषणातून समोर येईल. -डॉ. वर्षा रोटे, क्ष-किरण विभागप्रमुख, घाटी