कॉर्पोरेट ऑफिस, बॉण्ड पेपरवर हमी; कोटींचा गंडा घालून तथाकथित शेअर मार्केट तज्ज्ञ पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 04:51 PM2024-10-29T16:51:26+5:302024-10-29T16:51:49+5:30
शेअर मार्केटचा नाद, वाट्याला मनस्ताप, शहरात नववा घोटाळा, कोटींचा गंडा घालून ब्रोकर पसार
छत्रपती संभाजीनगर : आलिशान इमारतीत कार्यालय, आकर्षक फर्निचर, विविध ट्रॉफी ठेवून स्वत:ला शेअर मार्केटचा तज्ज्ञ सांगणाऱ्या ठगाने जवळपास २० जणांना कोट्यवधींना गंडवले. काही महिने परतावा देऊन राहुल राजेंद्र काबरा (रा. एन-४) हा पसार झाला आहे.
मराठा माध्यमिक शाळेतून सेवानिवृत्त ७३ वर्षीय हेमंत रंगनाथ जगताप (रा. देवळाई) यांचा नातेवाईक अनिल तांगडे (रा. नाईकनगर) याच्या माध्यमातून राहुलसाेबत ओळख झाली होती. राहुल नोंदणीकृत ब्रोकर असून, झिरोदा या स्टॉक एक्स्चेंज कंपनीचा अधिकृ़त प्रतिनिधी असल्याची थाप मारली. त्याच्यामार्फत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास ६ टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे आमिष त्यांना दाखवण्यात आले. त्याच्यावर विश्वास ठेवत हेमंत यांनी सेवानिवृत्तीचे १० लाख व मुलाच्या नावे १०, असे २० लाख रुपये त्याच्याकडे गुंतवले. जुलै २०२३ पर्यंत राहुलने परतावा दिला. मात्र, त्यानंतर कार्यालय बंद करून पसार झाला. त्यानंतर हेमंत यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून रविवारी एमआयडीसी सिडको ठाण्यात राहुल, त्याचा साथीदार तांगडेवर गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक जगन्नाथ मेदकुदळे तपास करत आहेत.
आधी थाट, नंतर घरही सोडून पसार
राहुलने मॉस्को कॉर्नर येथील गोल्डन सिटी सेंटरमध्ये आलिशान कार्यालय थाटले होते. तेथे तो १०० रुपयांच्या बॉण्डवर करार करत होता. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून चांगला परतावा देण्याचे आमिष तो दाखवत होता. विशेष म्हणजे, याच इमारतीत आभा इन्व्हेस्टमेंटच्या पंकज चंदनशिवेचेदेखील कार्यालय होते. राहुलने आत्तापर्यंत २० जणांना २ कोटींना गंडा घातल्याचा अंदाज असून, यात आणखी तक्रारदार वाढण्याची शक्यता आहे.
शेअर मार्केटचा नाद.....
गेल्या दहा महिन्यांमध्ये शहरात शेअर मार्केटचा हा नववा घोटाळा आहे. नुकतेच मयूर बाफना व श्रुती बाफना हे दाम्पत्य अनेकांना गंडा घालून पसार झाले. त्याशिवाय आभाचा चंदनशिवे, भारत ट्रेडिंगचा भरत पवार, एस. एम. कॅपिटल, लक्ष्मी कॅपिटलचा मनोज भोसले, ए. एस. एंटरप्रायजेसचे अमाेल दरंदले व विक्रम दरंदले या दोन भावांच्या घोटाळ्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.