महापालिकेने ‘कोरोना निगेटिव्ह’ प्रमाणपत्र दिले नाही; व्यापाऱ्यांनी दुकानासमोर लावल्या पाट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 07:36 PM2020-07-23T19:36:28+5:302020-07-23T19:40:02+5:30
कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र देण्याची ही पद्धत नैतिकदृष्ट्या योग्य नसून, हा प्रकार आक्षेपार्ह असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून व्यक्त झाली आहे.
औरंगाबाद : कोरोना टेस्ट करवून घेण्याची महापालिकेने व्यापाऱ्यांना सक्ती केली. मात्र ‘कोरोना निगेटिव्ह’चे प्रमाणपत्र महापालिकेने दिले नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे. या प्रकारामुळे व्यापाऱ्यांनी कोरोना तपासणी केली, मी निगेटिव्ह आलो; पण मनपाने अजून प्रमाणपत्र दिले नाही’, अशा पाट्या लावल्या आहेत. दरम्यान, कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र देण्याची ही पद्धत नैतिकदृष्ट्या योग्य नसून, हा प्रकार आक्षेपार्ह असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून व्यक्त झाली आहे. शिवाय कोरोना पॉझिटिव्ह व्यापाऱ्यांची संख्या देण्यासही व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.
महापालिकेतर्फे सध्या व्यापाऱ्यांची कोरोना टेस्ट घेण्याचे काम चालू आहे. कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र दुकानात लावल्याशिवाय व्यापार सुरू करता येणार नाही. अनेक जणांनी टेस्ट करवून घेतल्या. मात्र, त्यांंना महापालिकेचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे. काही ग्राहक व्यापाऱ्यांना ‘कोरोना टेस्ट’ करवून घेतली का, अशी विचारणा करीत आहेत. यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी ‘मनपाने अजून प्रमाणपत्र दिले नाही’, अशा पाट्या लावल्या आहेत.
यासंदर्भात किराणा व्यापारी संजय मुथियान यांनी सांगितले की, मनपाचे प्रमाणपत्र न मिळाल्याने अखेर दुकानासमोर ‘मनपाकडून कोरोना तपासणी केली व मी निगेटिव्ह आलो आहे. अजून प्रमाणपत्र मिळाले नाही’ , अशी पाटी लावली. अडत व्यापारी मुजीब खान यांनी सांगितले की, अनलॉक सुरू होऊन ४ दिवस झाले. मनपाने अजूनही जाधववडीतील अडत्या, हमालांसाठी स्वतंत्र तपासणी शिबीर घेतले नाही. अशाच प्रकारची तक्रार दूध विक्रेते आणि शाहगंज व औरंगपुरा येथील भाजीविक्रेत्यांनी केली आहे.
महापालिका व्यापाऱ्यांना देणार आॅनलाईन प्रमाणपत्र
महापालिकेकडून गुरुवारपासून टेस्ट करण्यात आलेल्या प्रत्येक व्यापाऱ्याला आॅनलाईन पद्धतीने मोबाईलवर कोविड निगेटिव्ह असल्याचा मेसेज प्राप्त होणार आहे. दुकानांची तपासणी करताना संबंधित व्यापाऱ्याच्या मोबाईलवरील लिंक तपासली जाणार आहे, अशी माहिती प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली. प्रत्येक व्यापाऱ्याला उद्यापासून राज्य शासनाच्या पोर्टलवरून आपण कोविड निगेटिव्ह आहात, भविष्यात सोशल डिस्टन्स पाळा, मास्क वापरा, असा संदेश येईल. हा मेसेज डुप्लिकेट स्वरूपात कोणालाही तयार करता येणार नाही. मेसेज फॉरवर्ड करता येईल; पण त्याची बोगस लिंक तयार करता येणार नाही. ९९ टक्के व्यापाऱ्यांना मेसेज टाकण्याची व्यवस्था महापालिकेच्या कंट्रोल रूममधून करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. महापालिका प्रत्येक टेस्ट केलेल्या व्यक्तीला अशा पद्धतीचे आॅनलाईन प्रमाणपत्र देणार आहे.
महासंघाने घेतली हरकत
शहरातील व्यापारी येथील नागरिक आहेत. मात्र, मनपा दररोज एवढे व्यापारी पॉझिटिव्ह निघाले, असे जाहीर करीत आहे, हे चुकीचे आहे. त्याचा शहरातील व्यवसायावर परिणाम झाला आहे. मनपाने किती व्यापारी पॉझिटिव्ह निघाले हे जाहीर करू नये. इतर नागरिकांबरोबरच त्याची नोंद करावी, तसेच केंद्रावर मोठ्या रांगा न लावता सर्वांना टोकन देऊन त्या वेळेनुसार बोलवावे. व्यापाऱ्यांची आकडेवारी जाहीर करण्यास आम्ही हरकत घेतली आहे.
- लक्ष्मीनारायण राठी, महासचिव, व्यापारी महासंघ
गुप्तता ठेवायची तिथे प्रमाणपत्र अयोग्यच
कोरोना पॉझिटिव्ह असो वा निगेटिव्ह, तपासणी केलेल्या व्यक्तीची माहिती गुप्त ठेवणे प्रशासनाचे काम आहे. सुमारे १५ हजार व्यापाऱ्यांची अँटिजन टेस्ट झाली. त्यांच्यातील जे निगेटिव्ह आले त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे मनपाने जाहीर केले आहे. मात्र, अजून कोणालाच प्रमाणपत्र दिले नाही. मुळात माहिती गुप्त ठेवायची असल्याने मनपा कोरोना निगेटिव्ह व्यापाऱ्यांना प्रमाणपत्र कसे काय देऊ शकते, असे प्रमाणपत्र दुकानात लावणे नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे.
- अजय शहा, व्यापारी