जंगल सफारी पार्कसाठी मनपाचा प्रस्ताव तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:04 AM2021-07-25T04:04:01+5:302021-07-25T04:04:01+5:30
औरंगाबाद : मिटमिटा येथे जागतिक दर्जाचे भव्य जंगल सफारी पार्क उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातले आहे. मुख्यमंत्र्यांनी ...
औरंगाबाद : मिटमिटा येथे जागतिक दर्जाचे भव्य जंगल सफारी पार्क उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार महापालिकेने सविस्तर प्रस्ताव सादर केला असून, लवकरच तो मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात जागतिक दर्जाचे पार्क उभारण्याची ठाकरे यांची इच्छा आहे.
महसूल विभागाने महापालिकेला पाच वर्षांपूर्वी मिटमिट्यात १०० एकर जागा दिली आहे. या जागेत सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील सर्व २५० प्राणी स्थलांतरित करण्यात येतील. बिबट्या, टायगर सफारीसाठी स्वतंत्र जागा हवी आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी स्मार्ट सिटीतून १७४ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. आ. प्रदीप जैस्वाल यांनी सफारी पार्कसाठी अतिरिक्त जागा मिळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच एक ऑनलाइन बैठक घेतली. मिटमिट्यातील सफारी पार्क जागतिक दर्जाचे बनविण्यासाठी प्रयत्न करावेत. अतिरिक्त जागा आणि त्याकरिता लागणाऱ्या निधीसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.
या संदर्भात प्रशासक पाण्डेय यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जागतिक दर्जाचे सफारी पार्क उभारण्यासाठी ५५ हेक्टर जमीन सध्या उपलब्ध आहे. अतिरिक्त जागेमध्ये वाघ आणि सिंहाची सफर घडविण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रस्ताव जवळपास पूर्ण होत आला आहे. लवकरच शासनाला सादरही करण्यात येईल. त्यासोबतच या कामासाठी निधीचीदेखील मागणी केली जाणार आहे.