मनपा आठ नवीन शाळा सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:04 AM2021-06-16T04:04:41+5:302021-06-16T04:04:41+5:30
औरंगाबाद : महापालिकेतर्फे मराठी व उर्दू माध्यमाच्या प्रत्येकी चार अशा एकूण आठ नवीन शाळा सुरू करण्यात येणार आहेत. ...
औरंगाबाद : महापालिकेतर्फे मराठी व उर्दू माध्यमाच्या प्रत्येकी चार अशा एकूण आठ नवीन शाळा सुरू करण्यात येणार आहेत. सातारा, देवळाई परिसरात चार मराठी माध्यम तर मिटमिटा, जटवाडा, हिनानगर व चिकलठाणा परिसरात उर्दू शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने शिक्षकांना सर्वेक्षणाचे आदेशही दिले आहेत. त्यानुसार सर्वेक्षण सुरू केलेले आहे. चालू शैक्षणिक वर्षातच या नवीन शाळा सुरू करण्याचे नियोजन मनपाच्या शिक्षण विभागाने सुरू केले आहे.
शासन आदेशानुसार मंगळवारपासून शहरातील शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. महापालिकेच्या ७२, खाजगी ९०० अशा एकूण ९७२ शाळांचा यात समावेश आहे. शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून मनपा शिक्षकांनी आपल्या शालेय परिसरात सर्वेक्षण करण्यास प्रारंभ केला. याअंतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यात येत आहे. ऑनलाईन शिक्षणात पालिकेच्या शाळातील विद्यार्थ्यांना मोबाईल व इंटरनेटअभावी अनेक अडचणी येत आहेत. यासाठी शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे व सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या माध्यमातून कृती पुस्तिका तयार करण्यात येणार आहे. ज्यामुळे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणता येणार आहे. कृतिपुस्तिका तयार करण्यासाठी पालिका शिक्षकांना शशिकांत उबाळे, तुषार ताठे, अश्विनी हिवर्डे, श्रीमती रशिदउन्नीसा, समग्र शिक्षण अभियानाचे कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे हे प्रशिक्षण देणार आहेत.