कोरोना चाचणी न करणाऱ्या १५ खासगी लॅबला मनपाचा 'डोस'; परवानगी रद्दचा दिला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 06:16 PM2022-01-15T18:16:26+5:302022-01-15T18:17:14+5:30
कोरोना चाचणीकडील दुर्लक्ष लॅब चालकांना भोवणार असे दिसत आहे
औरंगाबाद : संशयित कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी महापालिकेने शहरातील ३९ खासगी लॅबला टेस्टिंगची परवानगी दिली होती. दोन वर्षांत त्यातील १५ लॅब कामच करीत नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांची परवानगी रद्द का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस दिल्याचे मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य विभागाने कोविड-१९ तपासणीसाठी राज्यातील एनएबीएल व आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून आरटीपीसीआर तपासणीसाठी अधिकतम विक्री मूल्य निश्चित करण्याबाबत ६ डिसेंबर २०२१ रोजी निर्णय घेतला होता. यानुसार महापालिकेकडून शहरातील ३९ खासगी लॅब चालकांनी कोरोना चाचणी करण्यासाठी परवानगी घेतली होती. त्यासाठी रुग्ण स्वत:हून लॅबमध्ये आल्यास १०० रुपये, तपासणी केंद्रावरून नमुने घेतल्यास १५० तर रुग्णांच्या घरी जाऊन नमुना घेतल्यास २५० रुपयांचे शुल्क आकारण्याची सूचना होती. परवानगी घेतल्यानंतरही खासगी लॅब चालकाकडून कोविडच्या चाचणीस टाळाटाळ झाली. ३९ लॅबपैकी २४ लॅब चालकांनी रुग्णांची तपासणी केली. मात्र, १५ लॅबचालकांनी एकाही रुग्णाची चाचणी केली नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या लॅबचालकांना परवानगी रद्द का करू नये, म्हणून कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.
या लॅब चालकांना नोटीस
एमआयटी हॉस्पिटल, एशियन सिटी केअर, मराठवाडा लॅब रोशनगेट, मिल्ट्री हॉस्पिटल छावणी, यशवंत गाडे हॉस्पिटल गारखेडा, आयएमए हॉल शनिमंदिरजवळ, गणेश लॅबोरेटरी सर्व्हिसेस पुंडलीकनगर, ओरीयन सिटी केअर हॉस्पिटल, अमृत पॅथाॅलॉजी लॅब जालना रोड, सुमनांजली नर्सिंग होम, युनिसेफ पॅथाॅलॉजी लॅब, भडकलगेट, कृष्णा डायग्नोस्टिक, कस्तुरी पॅथ लॅब गारखेडा, सह्याद्री हॉस्पिटल सिडको एन-२ यांचा समावेश आहे.