नगरसेवक सय्यद मतीन एमपीडीएखाली स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:46 AM2018-08-22T00:46:06+5:302018-08-22T00:46:45+5:30
वाढत्या गुन्हेगारी व धोकादायक कारवायांची गंभीर दखल घेऊन सय्यद मतीन सय्यद रशीद (३८, रा. टाऊन हॉल) यास पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी ‘महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्याखाली (एमपीडीए) मंगळवारी स्थानबद्धतेचा आदेश दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वाढत्या गुन्हेगारी व धोकादायक कारवायांची गंभीर दखल घेऊन सय्यद मतीन सय्यद रशीद (३८, रा. टाऊन हॉल) यास पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी ‘महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्याखाली (एमपीडीए) मंगळवारी स्थानबद्धतेचा आदेश दिला आहे.
मतीन याच्यावर बेकायदेशीर जमाव जमविणे, जाळपोळ करून नुकसान पोहोचविणे, मनुष्यहानी होईल असे धोकादायक कृत्य करणे, जाणीवपूर्वक नुकसान पोहोचविणे, लोकसेवकांवर हल्ला करणे, आदेशाचे उल्लंघन करणे, सरकारी कामात अडथळा, दोन जमातींत तेढ निर्माण करणे, असे विविध गुन्हे दाखल आहेत. त्याची ही प्रवृत्ती पाहता त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव दाखल केलेला आहे. ही प्रक्रिया चालू असताना त्याच्या चढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. मतीन यास मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे, असे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी सांगितले.