दारुचे दुकानबंद करण्यासाठी नगरसेवकांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न
By Admin | Published: July 15, 2017 03:20 PM2017-07-15T15:20:55+5:302017-07-15T15:20:55+5:30
कारेगाव रोड परिसरातील दारुचे दुकान बंद करावे, या मागणीसाठी सर्व पक्षीय नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला़.
ऑनलाईन लोकमत
परभणी : कारेगाव रोड परिसरातील दारुचे दुकान बंद करावे, या मागणीसाठी सर्व पक्षीय नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला़.
जिल्हा उद्योग केंद्र, वन विभागाच्या कार्यालयासमोर असलेल्या कारेगाव रोड परिसरात एक दारुचे दुकान आहे़. दुकानाच्या पाठीमागे मुलींची शाळा, खाजगी शिकवण्या, शासकीय कार्यालये आणि नागरी वसाहत आहे. यामुळे येथे नागरिकांचा मोठा राबता असतो. या दुकानामुळे या भागातील हजारो नागरिकांना त्रास असून हे दुकान हटवावे, अशी मागणी मागील काही दिवसांपासून येथील नागरिकांची आहे. विरोध असतानाही सुरु असलेल्या या दारू दुकानाविरोधात प्रखर विरोध दर्शवन्यासाठी शेवटी सकाळी सर्व पक्षीय नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला.
नगरसेविका माधुरी बुधवंत, वनमाला देशमुख, उषाताई झांबड यांच्यासह नगरसेवक प्रशास ठाकूर, चंद्रकांत शिंदे, रितेश जैन, बाळासाहेब देशमुख, विशाल बुधवंत, विश्वजीत बुधवंत, सय्यद कादर, अक्षय देशमुख आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.
लोकप्रतिनिधी व नागरिकांचा विरोध झुगारून दारू दुकानाला परवानगी देणा-या अधिका-यांवर कारवाई करा, अशी मागणी यावेळी सर्व नगरसेवकांनी केली.जिल्हाधिकारी पी़.शिवा शंकर यांनी यावेळी लवकरच योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन आंदोलकांना दिले.