कॉप्यांचा सुळसुळाट
By Admin | Published: February 19, 2016 12:16 AM2016-02-19T00:16:01+5:302016-02-19T00:38:23+5:30
बीड : बारावी परीक्षेत गुरुवारी झालेल्या इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरला आष्टी तालुक्यात कॉप्यांचा सुळसुळाट झाला
बीड : बारावी परीक्षेत गुरुवारी झालेल्या इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरला आष्टी तालुक्यात कॉप्यांचा सुळसुळाट झाला. शहरातील एका केंद्रावर तीन कॉपीबहाद्दर ‘रस्टीकेट’ करण्यात आले.
जिल्ह्यात ९२ केंद्रांवर सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत लेखी परीक्षा झाली. ३५ हजार २४ परीक्षार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंद केली होती. त्यापैकी ३३ हजार ६६४ परीक्षार्थी हजर राहिले. बीडमध्ये बालेपीर भागातील इंदिरा गांधी उर्दू विद्यालयात दुपारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. आर. माळी यांनी भेट दिली. यावेळी तिघे जणांना कॉप्या करताना रंगेहाथ पकडले.
आष्टी तालुक्यातील गंगादेवी व देऊळगावघाट येथील परीक्षा केंद्रांवर सर्रास कॉप्या सुरु होत्या. चार ते पाच परीक्षार्थी एकत्रित बसून कॉप्या करत होते. केंद्रसंचालक व पर्यवेक्षकांची याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप शिक्षणप्रेमी संजय जपकर यांनी केला. कॉप्यांमुळे वर्षभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. उल्लेखनीय हे की, दोन्ही केंद्रांवर एकही बैठे अथवा भरारी पथक नव्हते. या दोन्ही केंद्रांवरील काप्यांचे छायाचित्र व चित्रफित सोशल मीडियावर दिवसभर फिरली.
याबाबत आष्टीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.
पाटोदा येथील परीक्षा केंद्रांवरही याहून वेगळी स्थिती नव्हती. जयभवानी केंद्रावर उत्तराची झेरॉक्स प्रत आढळून आली. केंद्रावरील भेटनोंदवहीत पथकाने नाराजी व्यक्त केली. याबाबत केंद्रप्रमूख ए. एस. गोरे म्हणाले, क्षमतेपेक्षा जास्त परीक्षार्थी असल्याने अडचणी आहेत. (प्रतिनिधी)