लाचखोर किशोर देशमुखची एसीबीकडून उघड चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:03 AM2021-03-26T04:03:57+5:302021-03-26T04:03:57+5:30
वाळू व्यावसायिकांचे जप्त केलेले दोन हायवा ट्रक सोडविण्यास मदत करण्यासाठी आणि विनाअडथळा वाळू वाहतूक करू देण्याकरिता अप्पर तहसीलदार किशोर ...
वाळू व्यावसायिकांचे जप्त केलेले दोन हायवा ट्रक सोडविण्यास मदत करण्यासाठी आणि विनाअडथळा वाळू वाहतूक करू देण्याकरिता अप्पर तहसीलदार किशोर देशमुख याला दीड लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. एक दिवस पोलीस कोठडीत राहिल्यावर न्यायालयाने देशमुखची बुधवारी हर्सूल कारागृहात रवानगी केली. या कारवाईने महसूल विभागातील हफ्तेखोरी चव्हाट्यावर आली. महसूल विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून अवैध वाळू वाहतूक बिनबोभाट सुरू असल्याचे पुन्हा समोर आले. पोलीस आणि महसूल विभागाला हफ्ते दिल्याशिवाय वाळू वाहतूक करणे अशक्य असल्यामुळे वाळूचे दर ८ हजार रुपये प्रतिब्रासपर्यंत गेले आहेत. देशमुखला लाच घेताना पकडल्यामुळे देशमुख याने लाचखोरीतून कुठे आणि किती मालमत्ता खरेदी केल्या याविषयीची चौकशी करण्याचा निर्णय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतला. पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी याविषयी सांगितले की, देशमुख हा शासकीय सेवेत रुजू झाल्यापासून आजपर्यंत त्याने कुठे नोकरी केली. त्याला किती वेतन मिळाले आणि आज त्याच्याकडे असलेली मालमत्ता, याविषयी तपास केला जाईल. या उघड चौकशीत जर देशमुखकडे त्याच्या उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती आढळून आली तर त्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा दुसरा गुन्हा दाखल केला जाईल.
==================
देशमुखचा ऑपरेटर शोधण्याची रिपाइंची मागणी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे मराठवाडा युवक अध्यक्ष नागराज गायकवाड यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी एसीबीचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यात त्यांनी नमूद केले की, देशमुखला दीड लाख रुपये लाच घेताना पकडण्यात आले. देशमुखचा पाठीराखा जिल्हाधिकारी कार्यालयातील सुपर क्लास वन अधिकारी आहे. यामुळे देशमुखच्या काळ्या कारनाम्यावर सतत पडदा टाकला जातो. यामुळे यादृष्टीने तपास करावा, अशी मागणी केली.