'मुलांना चांगले संस्कार देऊ शकलो नाही'; फेसबुक पोस्ट लिहून व्यथित पित्याने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 07:23 PM2023-04-11T19:23:06+5:302023-04-11T19:23:32+5:30
दावरवाडी येथील शेतकरी दत्तात्रय राधाकिसन सोरमारे यांनी सोमवारी रात्री १० वाजेच्यासुमारास त्यांच्या फेसबुकवर मित्र व नातेवाईकांना उद्देशून एक पोस्ट केली.
दावरवाडी (ता. पैठण): मुलांना चांगले शिक्षण दिले; परंतु चांगले संस्कार देऊ शकलो नाही, अशी खंत व्यक्त करणारी पोस्ट फेसबुकवर करून एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पैठण तालुक्यातील दावरवाडी शिवारात सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. दत्तात्रय राधाकिसन सोरमारे (वय ४९) असे मृताचे नाव आहे.
दावरवाडी येथील शेतकरी दत्तात्रय राधाकिसन सोरमारे यांनी सोमवारी रात्री १० वाजेच्यासुमारास त्यांच्या फेसबुकवर मित्र व नातेवाईकांना उद्देशून एक पोस्ट केली. त्यात ‘मी स्वतःची जीवनयात्रा गळफास घेऊन संपवत आहे. मी माझ्या मुलांना चांगले शिक्षण दिले; पंरतु चांगले संस्कार देऊ शकलो नाही, यांची मला खंत वाटत आहे. त्यामुळे मी माझी जीवनयात्रा संपवत आहे’, अशी भावनिक पोस्ट केली. ही पोस्ट पाहताच जि.प.चे माजी सदस्य कमलाकर एडके व पोलिसपाटील एकनाथ काशिद यांनी याबाबत पाचोड पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सपोनि संतोष माने, जमादार ए. जी. गव्हाणे, पोलिस नाईक पवन चव्हाण आदींनी तात्काळ गावात धाव घेऊन, दत्तात्रय सोरमारे यांचा शोध घेतला; परंतु ते सापडत नसल्याने व फोनवर बेल जात होती; परंतु फोन घेतला जात नसल्याने पोलिसांनी सायबर गुन्हे शाखेची मदत घेतली.
सायबर गुन्हे शाखेचे पोलिस नाईक टरमळे यांनी अवघ्या पाच मिनिटांत मोबाईलचे लोकेशन देऊन दत्तात्रय सोरमारे यांचा शोध घेण्यास पाचोड पोलिस व ग्रामस्थांना मदत केली. त्यानुसार दत्तात्रय सोरमारे यांच्या मोबाईलचे लोकेशन त्यांच्या घरापासून साडेतीन किलोमीटर अंतरावर दावरवाडी-पैठण शेतरस्त्यावर दाखवले. पोलिसांनी तात्काळ तेथे धाव घेऊन पाहणी केली असता, सोरमारे यांनी एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना झाडावरून उतरवून पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. यु. घुगे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मृत सोरमारे यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी अकरा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, दोन अविवाहित मुली, जावई असा परिवार आहे. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार ऐ. जी. गव्हाणे, पवन चव्हाण आदी करीत आहेत.
पाण्याच्या व्यवसायात झाले नुकसान
मृत दत्तात्रय सोरमारे यांना ३ एकर कोरडवाहू शेती असून, त्यांनी त्यांच्या मुलाला शुद्ध जलविक्रीचा व्यवसाय उभारून दिला होता; परंतु त्यांचा मुलगा या व्यवसायातून आलेली रक्कम खर्च करीत होता. त्यामुळे त्यांनी चार दिवसांपूर्वी मुलाच्या हातातून हा व्यवसाय काढून घेतला होता व ते स्वत:च हा व्यवसाय चालवत होते. यातून ते नैराश्येत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.