आत्महत्या करीत असल्याचा मेसेज पाठविणाऱ्या विवाहितेचे समुपदेशन करून वाचविले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:02 AM2021-03-23T04:02:07+5:302021-03-23T04:02:07+5:30
बायपास परिसरातील एका सोसायटीत पती, दीर आणि सासू सासऱ्यासह तक्रारदार विवाहिता राहते. किरकोळ आणि घरगुती कारणावरून तिचे सासरे आणि ...
बायपास परिसरातील एका सोसायटीत पती, दीर आणि सासू सासऱ्यासह तक्रारदार विवाहिता राहते. किरकोळ आणि घरगुती कारणावरून तिचे सासरे आणि दीर तिला सतत टोमणे देतो आणि मानसिक छळ करतात. त्यांच्याकडून होणारा त्रास असह्य झाला. आता मी आत्महत्या करीत आहेत. यात पतीची चूक नाही असा मेसेज तिने पुंडलिकनगर ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना पाठविला. दुपारच्या जेवणासाठी घरी निघालेल्या सोनवणे यांनी रस्त्यातून वाहन परत फिरविले आणि त्या महिलेला कॉल केला. मात्र तिने मोबाइल बंद केला होता. त्यांनी तातडीने सायबर पोलिसांची मदत घेऊन तो कॉल कुठून आला, याची माहिती मिळविली. पोलीस उपनिरीक्षक मीरा चव्हाण, शिपाई इमरान अत्तार यांना सोबत घेऊन पोलिसांनी तिचे घर गाठले. यावेळी तेथे घरातील मंडळी आपापसांत भांडण करीत असल्याचे दिसले. मेसेज करणाऱ्या विवाहितेने स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते. आई दार उघडत नसल्यामुळे लहान मुले रडत होती. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तिला आवाज देऊन दार उघडण्यास लावले. तेव्हा ती रडत होती. लग्नाला दहा वर्षे उलटली तेव्हापासून सासरा आणि दीर लहान-मोठ्या कारणावरून त्रास देतो. आता त्रास सहन करण्याची सहनशीलता संपल्यामुळे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे विवाहितेने पोलिसांना सांगितले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक मीरा चव्हाण यांनी तिची समजूत काढली.
चौकट
सपोनि सोनवणे यांनी सासरच्या मंडळीना कायदेशीर कारवाई झाली तर काय होईल याविषयी चांगलीच तंबी दिली. त्यांनी तिला यापुढे त्रास होणार नाही, याची खबरदारी घेऊ, अशी ग्वाही दिली. समजूत काढल्यावर आत्महत्येचा विचार डोक्यातून काढून टाकत असल्याचे विवाहितेने पोलिसांना सांगितले.