कारवाईसोबत समुपदेशन; औरंगाबादमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईसाठी २० पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 01:59 PM2021-01-02T13:59:26+5:302021-01-02T14:01:50+5:30
kite nylon thread : नायलॉन मांजावर बंदी आहे, असे असताना शहरातील काही व्यापारी चोरुन नायलॉन मांजाची विक्री करीत
औरंगाबाद : पतंग उडविण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा पशू-पक्ष्यांसह, नागरिकांसाठी प्राणघातक ठरत आहे. ही बाब लक्षात घेऊन २०१७ मध्ये देशभरात नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली.
या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी नुकतीच एक अधिसू्चना जारी करून नायलॉन मांजा विक्री करणे आणि जवळ बाळगणाऱ्यांवर गुन्हा नोंदवून कारवाई करण्याचे आदेश दिले. या कारवाईसाठी २० पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकाने दोन दिवसांत १५ जणांवर गुन्हे नोंदविले. संक्रांतीच्या निमित्ताने देशभर पतंग उडविण्यास सुरुवात होते. पतंगबाजीसाठी नायलॉन दोऱ्याचा वापर होऊ लागला. आकाशात उडणारे पक्षी पतंगाच्या नायलॉन दोऱ्यात अडकून मृत्युमुखी पडल्याचे आणि गंभीर जखमी झाल्याच्या घटना सतत पहायला मिळतात.
नायलॉन मांजावर बंदी आहे, असे असताना शहरातील काही व्यापारी चोरुन नायलॉन मांजाची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याची गंभीर दखल घेतल्याचे सांगून पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता म्हणाले की, नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र एक पथक स्थापन केले आहे. या पथकांनी ३१ डिसेंबर रोजी छावणी, उस्मानपुरा, वेदांतनगर, सिटीचौक, पुंडलिकनगर आणि एमआयडीसी वाळूज ठाण्याच्या हद्दीतील ८ व्यापाऱ्यांवर छापे टाकून त्यांच्याकडून १३ हजार ८३० रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला.
पुंडलिकनगर पोलिसांची सात व्यापाऱ्यांवर कारवाई
पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या ७ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. विजय जीवन बडवणे, प्रवीण अरुण चव्हाण,आशिष सुनील सुंभ, विजय अजय नागलोथ, आकाश राजू काळे आणि मोहन वामन केवट अशी मांजाविक्रेते व्यापाऱ्यांची नावे आहेत. शिवाय त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली.
कारवाईसोबत समुपदेशन
नायलॉन मांजाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन लहान-मोठ्या व्यापाऱ्यांवरील कारवाईसोबत शहरातील तरुणांचे आणि व्यापाऱ्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. शिवाय व्यापारी महासंघाची बैठक घेण्यात येणार आहे.
-- डॉ. निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त