औरंगाबादेत नशेडी मुलांचे पोलिसांकडून समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 03:42 PM2018-09-20T15:42:27+5:302018-09-20T15:43:48+5:30
: व्हाईटनर, सोल्युशन आणि गोळ्या सेवन करून नशा करणाऱ्या अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यासाठी पोलिसांनी तीन पथके स्थापन केली आहेत.
औरंगाबाद : व्हाईटनर, सोल्युशन आणि गोळ्या सेवन करून नशा करणाऱ्या अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्यासाठी पोलिसांनी तीन पथके स्थापन केली आहेत. या पथकांनी आठ दिवसांत ५२ बालकांना नशा करताना पकडले. त्यांच्या आई-वडिलांना बोलावून त्यांच्यासमोर या बालकांचे समुपदेशन केले. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ.दीपाली धाटे-घाडगे यांनी दिली.
डॉ. दीपाली घाडगे म्हणाल्या की, शहराच्या हद्दीतील विविध ठिकाणी व्हाईटनर, सुलोचनची नशा करण्यासोबतच झोपेच्या गोळ्यांचा नशेसाठी वापर केला जात असल्याचे समोर आले. या प्रकारची नशा करणाऱ्यांमध्ये झोपडपट्टी भागातील अल्पवयीन मुले सर्वाधिक आहेत. आई-बाबांची नजर चुकवून ही मुले नशा करीत असल्याचे निष्पन्न झाले. आज आपल्यासमोर शताब्दीनगर येथील पंधरा आणि नऊ वर्षांची दोन भाऊ त्यांच्या आईसोबत हजर करण्यात आले होते. तीन ते चार वर्षांपासून व्हाईटनरची नशा करणाऱ्या पंधरा वर्षांच्या मुलाकडे पाहून तो आठ ते नऊ वर्षांचा असावा असे दिसले.
नशेमुळे त्याचे जेवण कमी झाल्याने त्याची वाढ खुंटल्याचे दिसून आले. त्याच्यासोबत त्याच्या लहान भावालाही व्हाईटनरच्या नशेचे व्यसन लागले.
गरीब कुटुंबातील ही मुले असून, त्याची आई धुणीभांडी करते तर वडील गॅरेजवर काम करतात. मोठा एक वर्षापासून तर लहान एक महिन्यापासून शाळेत जात नाही. याविषयी त्याच्या आईला समजले होते. तिने चिमुकल्यांना नशा करू नये म्हणून समजावून सांगून पाहिले. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. आज या मुलांचे मानसोपचार तज्ज्ञांमार्फत समुपदेशन केले जाणार आहे. अशाच प्रकारे शहरातील अन्य नशेखोर मुलांचे समुपदेशन केले जाणार असल्याचे उपायुक्तांनी सांगितले.
तीन पथके करणार कारवाई
नशेच्या आहारी गेलेल्या मुलांचे वेळीच समुपदेशन झाल्यास त्यांचे आयुष्य बदलू शकते, ही बाब लक्षात घेऊन विशेष शाखेचे उपनिरीक्षक गोरख चव्हाण, उपनिरीक्षक सौदागर यांच्यासह तीन पथके स्थापन करण्यात आली. प्रत्येक पथकात चार कर्मचारी असतील. प्रत्येक पथक आठ दिवस शहरात कारवाई करील. त्यानंतर दुसऱ्या सप्ताहात दुसरे पथक आणि त्यापुढील सप्ताहात अन्य पथक कार्यरत राहील.