शिरसटांच्या मताधिक्यावर राजू शिंदेंना शंका; व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची मागणी केली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 01:22 PM2024-11-25T13:22:14+5:302024-11-25T13:24:32+5:30
आमदार संजय शिरसाट हे १ लाख २२ हजार ४९८ मते घेऊन विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राजू शिंदे यांना १ लाख ६ हजार १४७ मतांवर समाधान मानावे लागले.
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार आमदार संजय शिरसाट यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उद्धवसेनेचे उमेदवार राजू शिंदे यांचा १६ हजार ३५१ मतांनी पराभव केला. या निकालावर संशय व्यक्त करीत शिंदे यांनी व्हीव्ही पॅट चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची मागणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
शहरातील पश्चिम मतदारसंघाच्या निवडणुकीत आमदार संजय शिरसाट हे १ लाख २२ हजार ४९८ मते घेऊन विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राजू शिंदे यांना १ लाख ६ हजार १४७ मतांवर समाधान मानावे लागले. या निकालावर शिंदे यांनी शंका व्यक्त करीत निवडणूक अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक आयुक्तांना पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आमदार संजय शिरसाट यांना मिळालेली मतांविषयी शंका उपस्थित केल्या. आपल्याला विजयी उमेदवारापेक्षा अधिक मतदान मिळणे अपेक्षित होते. यामुळे मतदारांनी मतदान यंत्रात केलेल्या मतदानाच्या वेळी तयार झालेल्या व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. त्यांच्या या मागणीची निवडणूक विभाग दखल घेते अथवा नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतांच्या आकडेवारीवर विश्वास नाही
पश्चिम मतदारसंघात आपल्याला मतदारांनी भरभरून मतदान केले होते. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेरील आपल्या पक्षाच्या मंडपातच अधिक मतदार दिसत होते. तेव्हा साहजिकच आपल्याला अधिक मते मिळणे अपेक्षित होते. असे असताना मतमोजणीत आपल्याला १ लाख ६ हजार १४७ मते मिळतात तर प्रतिस्पर्धी उमेदवाराला १ लाख २२ हजार ४९८ मते मिळतात, यावर आपला विश्वास नाही. यामुळे आपण व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची मागणी निवडणूक विभागाकडे केली आहे.
- राजू शिंदे, पराभूत उमेदवार