प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी
By Admin | Published: February 21, 2017 10:31 PM2017-02-21T22:31:02+5:302017-02-21T22:31:55+5:30
लातूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी सकाळी १० वाजता दहाही तालुक्यांच्या ठिकाणी होणार आहे.
लातूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी सकाळी १० वाजता दहाही तालुक्यांच्या ठिकाणी होणार आहे. गट व गणांसाठी मतमोजणीचे स्वतंत्र टेबल असून, प्रत्येक टेबलांवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक सहाय्यक, एक मास्टर ट्रेनर व एक चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दरम्यान, मतमोजणीचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, बुधवारी दहाही तहसील कार्यालयांत दुपारी ३.३० वाजता मतमोजणीची रंगीत तालीमही होणार आहे.
टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, लेखापालांचे पथक मतदान निश्चितीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. प्रशासनाने निवडणूक झाल्यापासून मतमोजणीसाठी दोनवेळा संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. याव्यतिरिक्त बुधवारी मतमोजणीची रंगीत तालीम होणार आहे. ही तालीम प्रत्यक्ष मतमोजणीसारखीच असणार आहे. डमी इलेक्ट्रॉनिक मशीनचे सील उमेदवारासमोर उघडणे व सह्या घेणे आणि त्यानंतर मतमोजणी. जेवढे कर्मचारी प्रत्यक्ष मतमोजणीला नेमण्यात आले आहेत, तेवढेच या रंगीत तालमीतही असणार आहेत. त्यानुसार बुधवारी सर्व तहसील कार्यालयांत दुपारी ३.३० वाजता मतमोजणीची रंगीत तालीम होणार असल्याचे सामान्य प्रशासनाचे जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी सांगितले.
गुरुवारी होणाऱ्या प्रत्यक्ष मतमोजणीला जिल्ह्यातील ५८ गटांसाठी ५८ टेबल आणि ११६ गणांसाठी ११६ टेबल. प्रत्येक टेबलांवर चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. गट व गणांची स्वतंत्र टेबले असल्याने काहींचे निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे. मतमोजणी कक्षाबाहेरील लोकांना फेरीनिहाय निकाल सांगण्याची सोय करण्यात आली असून, मतमोजणी कक्षातील कामकाजाचे व्हिडिओ चित्रिकरण होणार आहे. शिवाय, तेथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, ओळखपत्राशिवाय मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून उमेदवार, प्रतिनिधींना ओळखपत्र दिले जाणार आहे. दरम्यान, औसा तालुक्यातील नऊ गट आणि अठरा गणांसाठी प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात गुरुवारी मतमोजणी होणार आहे. गट व गणांसाठी स्वतंत्र टेबलांची सोय करण्यात आली असून, एका टेबलवर एकूण ४ कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.