बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:55 AM2018-03-01T00:55:42+5:302018-03-01T00:56:55+5:30
बनावट नोटा चलनात आणणाºया रॅकेटचा पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी पर्दाफाश केला. या टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून पाचशे रुपये किमतीच्या दीड लाखांच्या ३०० बनावट नोटा आणि दोन दुचाकी जप्त केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बनावट नोटा चलनात आणणाºया रॅकेटचा पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी पर्दाफाश केला. या टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून पाचशे रुपये किमतीच्या दीड लाखांच्या ३०० बनावट नोटा आणि दोन दुचाकी जप्त केल्या.
अफसर पठाण (३८, रा. नारेगाव), भिका वाघमारे (३९, रा. चिकलठाणा, मूळ रा. लक्ष्मीनारायणपुरा, जुना जालना) आणि सुनील बोराडे (३५, रा. श्रीरामपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे म्हणाले की, शहरातील कॅनॉट प्लेस परिसरात दोन जण पाचशे रुपये चलनाच्या बनावट नोटांसह फिरत असल्याची माहिती खबºयाकडून पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक वामन बेले, कर्मचारी प्रमोद पवार, इसाक पठाण, विनोद परदेशी, गणेश वैराळकर, विनायक गीते आणि महिला पोलीस काळे यांनी कॅनॉट प्लेस येथे आरोपींचा शोध घेतला असता एका हॉॅटेलसमोर आरोपी अफसर पठाण हा मोटारसायकलवर तर भिका वाघमारे मोपेडवर आपसात बोलत जात असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांच्या मागून वेगात जाऊन त्यांची वाहने आडवी लावली आणि त्यांना ताब्यात घेऊन कार्यालयात नेले. तेथे पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता अफसरच्या खिशात पाचशे रुपयांच्या बनावट ६६ नोटा तर वाघमारेच्या खिशात पाचशे रुपयांच्या बनावट १०० नोटा आाणि मोपेडच्या डिक्कीत पाचशे रुपयांच्या १०० बनावट नोटा मिळाल्या. याशिवाय त्यांच्याकडे अनुक्रमे रोख १० हजार रुपये आणि ५१० रुपये ओरिजनल मिळाले. त्यांची कसून चौकशी केली असता अफसर यास भिका वाघमारे याने या नोटा दिल्याचे त्याने सांगितले. भिकाने चौकशीअंती कमिशन तत्त्वावर या नोटा श्रीरामपूर येथील सुनील बोराडे याच्याकडून आणल्याची कबुली दिली. ५० हजार रुपये देऊन आरोपी सुनीलकडून एक लाखाच्या बनावट नोटा घेतल्याचे सांगितले.
सुनील ही रक्कम घेण्यासाठी शहरात येणार असल्याची माहितीही त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांच्या सांगण्यावरून आरोपींनी त्याच्याशी संपर्क साधून रात्री साडेबारा वाजता पंचवटी चौकात बोलावून घेतले. तो तेथे येताच सापळा रचून थांबलेल्या पोलिसांनी त्यास पकडले. त्याच्याकडेही पाचशे रुपयांच्या बनावट ३४ नोटा पोलिसांना मिळाल्या. त्यानंतर त्यांच्याविरोधात सिडको ठाण्यात गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली.
या तिन्ही आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांच्यासमोर हजर केले असता तिघांना ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
आतापर्यंत आरोपींनी किती बनावट नोटा चलनात आणल्या, आदींचा सखोल तपास करावयाचा आहे. आरोपींच्या घराची झडतीही घेणे बाकी आहे. त्यामुळे आरोपींना दहा दिवस पोलीस कोठडी देण्याची विनंती त्यांनी केली असता न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.
पत्त्याच्या क्लबवर उधळल्या बनावट नोटा
पोलिसांनी सांगितले की, आरोपी अफसर हा भूखंड माफिया म्हणून नारेगाव परिसरात परिचित आहे. त्याच्याविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, हाणामारी करणे, दंगल करणे आदी स्वरुपाचे गंभीर गुन्हे एमआयडीसी सिडको ठाण्यात दाखल आहेत. तो शहरातील आणि शहराबाहेरील पत्त्याच्या क्लबवर नेहमी पत्ते खेळण्यासाठी जातो. काही दिवसांपासून तो सतत पाचशेच्या नोटांची बंडले काढून पत्ते खेळत असतो. त्याने पत्त्यावर उधळलेल्या नोटा या बनावट असल्याची माहिती समोर आल्याने ही बाबही खबºयाने पोलिसांना सांगितल्याचे सूत्रांकडून समजले. शिवाय लिंबेजळगाव येथे झालेल्या इज्तेमामध्येही सुमारे ६० हजार रुपयांच्या बनावट नोटा चालविल्याची कबुली त्याने दिली.
जमीन खरेदीचा होता बेत
आरोपी अफसर आणि भिका वाघमारे हे दोघेही जमीन खरेदी- विक्री आणि भूखंड खरेदी- विक्रीत दलालीचे काम करतात. त्यांनी बनावट नोटा देऊन सुमारे दीड कोटी रुपयांची जमीन खरेदी करण्याचा बेत रचला होता. त्यानुसार त्यांनी आरोपी सुनील यास दीड कोटी रुपयांच्या नोटांची आॅर्डर दिली होती. मात्र तत्पूर्वी मंगळवारी आरोपींचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले.
या क्रमांकाच्या बनावट नोटा बाजारात
सुमारे दीड ते दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा आरोपींनी बाजारात चालविल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यापैकी काही नोटांच्या सिरीज
४ जीआर, २ एक्सई, ७ बीटी, ८ एसव्ही, अशा असल्याचे पोलिसांनी सांगितले. या सिरीजच्या नोटा आढळल्यास त्या खºया असल्याची खात्री करूनच पुढील व्यवहार करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले.
सुनील बोराडे यायचा काळी-पिवळी जीपने
आरोपी सुनील बोराडे हा पकडला जाऊ नये, यासाठी तो काळी-पिवळी जीपने श्रीरामपूर येथून औरंगाबादला येत असे. आरोपी अफसर आणि भिका यांना तो कमिशन तत्त्वावर नोटा देत असे.
श्रीरामपूर येथील एक जण त्यास नोटा पुरवायचा. तो त्या नोटा ठाणे, मुंबई येथून आणत होता, असे सूत्रांकडून समजले. यामुळे मुख्य आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक श्रीरामपूरकडे रवाना झाले.