वडवणी कृउबाच्या मतमोजणीत घोळ
By Admin | Published: September 10, 2015 12:04 AM2015-09-10T00:04:47+5:302015-09-10T00:33:11+5:30
वडवणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीदरम्यान मतमोजणीत अधिकाऱ्यांनीच घोळ केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
वडवणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीदरम्यान मतमोजणीत अधिकाऱ्यांनीच घोळ केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसह, जिल्हा उपनिबंधक, पोलिसाना गोपनीय अहवाल दिला असून पराभूत उमेदवारांनी पडताळणी करुन न्यायाची मागणी बुधवारी केली आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा अहवाल मागविला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्याच दिवशी रात्री निकालही जाहीर करण्यात आला. १२ जागा भाजपाला तर ६ जागा राष्ट्रवादीला मिळाल्याचे जाहीर केले होते. राष्ट्रवादीच्या ताब्यातील या संस्थेवर भाजपाने झेंडा फडकावला. त्यामुळे निवडणुकीची चर्चा जिल्हाभर झाली. मात्र, निकालास चोवीस तासही पूर्ण होत नाही तोच निवडणूक निर्णय अधिकारी एच. पी. कांबळे यांनी मतमोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मतांचे गणित मुद्दामहून चुकविले अन् काही पराभूत उमेदवारांना विजयी केल्याची खळबळजनक तक्रार केली. कांबळे यांनी जिल्हाधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था, वडवणी तसेच वडवणी ठाण्याचे निरीक्षक संतोष साबळे यांच्याकडे लेखी तक्रार केली. मतमोजणी अधिकारी एस. एस. तारडे यांच्यावर त्यांनी ठपका ठेवला आहे. सहायक निबंधक विकास जगदाळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
कारवाई अटळ!
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी महेंद्र कांबळे यांच्याकडून अहवाल मागविला आहे. दोषींची गय केली जाणार नसून योग्य ती कारवाई केली जाईल, असे नवल किशोर राम यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. अहवालानंतर काय ते स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.
पाच उमेदवारांच्या तक्रारी
मतमोजणी अधिकाऱ्यांना हाताशी धरुन भाजपाने यंत्रणा मॅनेज केली. याप्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी राज शेंडगे, गुलाब राऊत, दिनेश मस्के यांनी केली आहे. विलास मुंडे, सचिन लंगडे यांनी प्रक्रिया नव्याने राबविण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)