विधानसभेची आज मतमोजणी
By Admin | Published: October 19, 2014 12:26 AM2014-10-19T00:26:01+5:302014-10-19T00:42:27+5:30
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या रविवारी होणार असून प्रशासनाने या मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे.
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या रविवारी होणार असून प्रशासनाने या मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांची मतमोजणी वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. मोजणीसाठी प्रत्येक मतदारसंघात १४ टेबल असणार आहेत. सर्वप्रथम सकाळी ८ वाजता टपाली मतपत्रिकांच्या मोजणीला सुरुवात होईल. दुपारी १ वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत यावेळी तब्बल १५६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. बुधवारी मतदान होताच या उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) मध्ये बंद झाले. आता उद्या रविवारी या सर्वांचे भवितव्य ठरणार आहे.
मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. नऊ मतदारसंघांची मतमोजणी स्वतंत्रपणे वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात होईल. सर्वप्रथम टपाली मतपत्रिका मोजल्या जातील. त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी केली जाईल. मोजणीसाठी १४ टेबल असल्यामुळे एका फेरीत १४ मतदान केंद्रांवरील मतांची मोजणी होणार आहे. त्यामुळे मतदान केंद्रांचा विचार करता प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कमीत कमी १९ ते जास्तीत जास्त २४ फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरीसाठी १० मिनिटांचा वेळ लागणार आहे.
टपाली मतदान आणि त्यानंतरच्या प्रत्येक फेरीसाठी लागणारा वेळ पाहता दुपारी १ वाजेनंतर निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मतमोजणीच्या ठिकाणी टॅब्युलेशन टीमही असणार आहे. ही टीम प्रत्येक ईव्हीएम मशीन प्राप्त मतांची आकडेवारी संगणकात फीड करेल. त्याचवेळी ही आकडेवारी निवडणूक विभागाच्या वेबसाईटवरील लिंकवरही अपडेट केली जाणार आहे.
मोजणीसाठी हजार कर्मचारी
मतमोजणीसाठी एका मतदारसंघात १२० याप्रमाणे जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत एकूण एक हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलवर एक सुपरवायझर, एक सहायक आणि एक सूक्ष्म निरीक्षक असणार आहे. याशिवाय मास्टर ट्रेनर आणि रो आॅफिसर्सही असणार आहेत.
मतमोजणीची रंगीत तालीम संपन्न
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची आज रंगीत तालीम घेण्यात आली. सर्व ९ मतदारसंघांतील मतमोजणीच्या ठिकाणी त्या-त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही तालीम घेतली.
औरंगाबाद (मध्य) मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बप्पासाहेब थोरात आणि सहायक निवडणूक अधिकारी अभय म्हस्के यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून मतमोजणीची रंगीत तालीम करून घेतली. पैठण मतदारसंघाची तालीम रवींद्र पवार, सिल्लोड मतदारसंघाची सी.एस. कोकणी, कन्नड मतदारसंघात राजू नंदकर, फुलंब्री मतदारसंघात संजीव जाधवर, औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात रिता मेत्रेवार, औरंगाबाद पूर्व मतदारसंघात स्वाती कारले, गंगापूर मतदारसंघात संगीता सानप आणि वैजापूर मतदारसंघात नारायण उबाळे यांच्या उपस्थितीत मोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली.