देश परदेश- मार्गदर्शक पोस्टर्सच्या सूचना दिल्या नाहीत
By | Published: December 5, 2020 04:03 AM2020-12-05T04:03:04+5:302020-12-05T04:03:04+5:30
सूचना दिल्या नाहीत नवी दिल्ली : कोविड-१९ बाबतच्या आमच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोरोना रुग्णाच्या घराबाहेर भित्तीपत्रक (पोस्टर्स) आणि चिन्हे लावावीत, ...
सूचना दिल्या नाहीत
नवी दिल्ली : कोविड-१९ बाबतच्या आमच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोरोना रुग्णाच्या घराबाहेर भित्तीपत्रक (पोस्टर्स) आणि चिन्हे लावावीत, असे म्हटलेले नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला गुरुवारी सांगितले.
-------------
येमेनमध्ये ४५ टक्के
जनता अन्न संकटात
न्यूयॉर्क : येमेनच्या लोकसंख्येच्या ४५ टक्क्यांना (१३.५ दशलक्ष) अतितीव्र स्वरूपाच्या अन्न असुरक्षिततेला तोंड द्यावे लागत आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या इंटेग्रेटेड फूड सिक्युरिटी फेज क्लासिफिकेशन ॲनालिसिसने म्हटले. हीच टक्केवारी २०२१ च्या मध्यात ५४ टक्क्यांवर जाऊ शकते.
--------------------
चीनचा प्रजनन दर
घसरल्याचा इशारा
बीजिंग : चीनचा प्रजनन दर घसरला आहे, असे चीनचे नागरी कामकाजमंत्री ली जिहेंग यांनी म्हटले. चीनची लोकसंख्या वाढ ही चिंताजनक वळणावर येऊन पोहोचली आहे. चीनची लोकसंख्या येत्या काही वर्षांत घसरेल, असे लोकसंख्या शास्त्रज्ञांनी सांगितले होते.
----------------
फ्रान्समध्ये होणार ७६
मशिदींची चौकशी
पॅरिस : इस्लामिस्ट विचारधारेला चिथावणी देत असल्याच्या संशयावरून फ्रान्स सरकार ७६ मशिदींची चौकशी करणार आहे. फुटीरवादी शक्तींविरोधात सरकारने हाती घेतलेल्या मोहिमेत ही चौकशी होणार आहे, असे अंतर्गत मंत्री जेराल्ड डर्मानिन यांनी सांगितले. फ्रान्समध्ये गेल्या काही दिवसांत इस्लामी दहशतवाद्यांचे हल्ले झाले आहेत.
-----------------
टाइम मासिकाच्या
मुखपृष्ठावर गीतांजली
न्यूयॉर्क : ‘टाइम’ मासिकाच्या मुखपृष्ठावर भारतीय- अमेरिकन संशोधक गीतांजली राव हिचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. पाच हजार उमेदवारांतून राव हिची ‘किड ऑफ द ईअर’ म्हणून निवड झाली. तंत्रज्ञानाचा वापर करून दूषित पाण्याचा प्रश्न कसा सोडवला, हे गीतांजलीने अभिनेत्री अँजेलिना जोली यांना मुलाखतीत सांगितले.
------------------
ई-रिक्षाच्या बॅटरीचा
स्फोट, मुलगा ठार
ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) : ई-रिक्षाच्या बॅटरीचा घरात चार्जिंग केले जात असताना झालेल्या स्फोटात १२ वर्षांचा मुलगा ठार, तर इतर चार जण जखमी झाले. बहुधा बॅटरी अति प्रमाणात चार्ज झाल्यामुळे मुलगा ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
--------------
नामिबियात १७०
हत्ती विक्रीस
विंडहोऐक (नामिबिया) : नामिबियाने देशातील दुष्काळ आणि हत्तींची संख्या वाढल्यामुळे १७० हत्ती विक्रीस ठेवले आहेत, असे पर्यावरण मंत्रालयाने म्हटले. खरेदीसाठीच्या नियमांचे देशातील किंवा परदेशातील जो कोणी पालन करील त्याला हत्ती विकले जाणार आहेत.
-----------------------
अझरबैजानचे २,७८३
सैनिक मारले गेले
बाकू (अझरबैजान) : नागोरने-काराबाख या वादग्रस्त भागात अर्मेनियाशी झालेल्या संघर्षात आमचे २,७८३ सैनिक मारले गेले, असे अझरबैजानने गुरुवारी सांगितले, संघर्ष २७ सप्टेंबरला सुरू होऊन १० नोव्हेंबरला संपला. रशियाने केलेल्या मध्यस्थीनंतर हा संघर्ष थांबला.
------------------
नवाझ शरीफ
गुन्हेगार घोषित
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हे ‘गुन्हेगार’ असल्याचे इस्लामाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी जाहीर केले. भ्रष्टाचाराच्या दोनप्रकरणी शरीफ वारंवार समन्स बजावूनही न्यायालयात हजर राहिले नाहीत. शरीफ नोव्हेंबर २०१९ पासून लंडनमध्ये आहेत.
--------------
तोटा झाल्यामुळे दूध
व्यापाऱ्याची आत्महत्या
बुलंदशहर (उत्तर प्रदेश) : व्यवसायात झालेल्या तोट्यामुळे निराश झालेल्या
संदीप गर्ग (५३) या दूध व्यापाऱ्याने येथील कोतवालनगर भागात गुरुवारी सायंकाळी गोळी मारून घेऊन आत्महत्या केली, असे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. गर्ग सासऱ्याच्या घरी राहत होता. तोटा झाल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.
-----------