देशाला ‘सबका साथ, सबकी सुरक्षा’ हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 01:00 AM2017-07-23T01:00:02+5:302017-07-23T01:03:50+5:30
औरंगाबाद : स्वयंघोषित गोरक्षकांनी देशात आतापर्यंत ३५ जणांच्या हत्या केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : स्वयंघोषित गोरक्षकांनी देशात आतापर्यंत ३५ जणांच्या हत्या केल्या आहेत. मृतात २८ मुस्लिमांसह उर्वरित ८ दलित आणि अन्य जातीचे आहेत. मुस्लिम व दलितांना देशात ठरवून टार्गेट केले जात आहे; परंतु आम्ही मानवतावादी इस्लामचे पाईक आहोत. त्यांच्या या भ्याड हल्ल्याला हिंसेने प्रत्त्युत्तर देणार नाही, अन्यथा त्यांच्यात व आमच्यात काहीच फरक राहणार नाही, असे संयमी विचार मजलिस -ए-इत्तेहाद उल मुस्लिमीनचे (एमआयएम) सर्वेसर्वा खा. असदोद्दीन ओवेसी यांनी शनिवारी (दि.२२) येथे मांडले.
गोरक्षकांच्या हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खा. असदोद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सायंकाळी आझाद चौकातून कॅण्डल मार्च काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होती. रॅलीचे रूपांतर भडकल गेट येथे जाहीर सभेत झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर खा. ओवेसी यांनी तब्बल तासभर भाषण केले. या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप व गोरक्षकांवर टीकेची झोड उठविली.
खा. ओवेसी म्हणाले, देशात गोरक्षकांनी उच्छाद मांडला आहे. आतापर्यंत त्यांनी ३५ जणांचे प्राण घेतले. त्याचे दु:ख म्हणून हा कॅण्डल मार्च आम्ही काढला आहे. ही आनंदाची वेळ नाही. मृत ३५ जणांच्या नावाची यादीच वाचवून दाखवत प्रत्येकाचा खून क सा झाला, याचे वर्णनच ओवेसी यांनी कथन केले. या बहुतांश हत्या गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांत झाल्या आहेत. या ३५ कुटुंबांचे सध्या बेहाल आहेत. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. भाजप मानवतावादाच्या गप्पा मारते; पण वास्तव मात्र वेगळे आहे, असे सांगत ओवेसी म्हणाले, त्यांनी कितीही हिंसा केली तरी आम्ही प्रत्त्युत्तर देणार नाही. कारण इस्लाम शिकवण मानवतेला प्राधान्य देणारी आहे. यावेळी आ. इम्तियाज जलील, डॉ. गफ्फार कादरी यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिक या कॅण्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते.