देशाला शांती अन् प्रेमाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:33 AM2017-08-14T00:33:55+5:302017-08-14T00:33:55+5:30

सर्वांना मानवतेचा संदेश देण्यासाठी जमिअत उलमा-ए-हिंदतर्फे रविवारी जालना शहरात काढण्यात आलेल्या मूक अमन मार्चला मोठा प्रतिसाद मिळाला

 The country needs peace and love | देशाला शांती अन् प्रेमाची गरज

देशाला शांती अन् प्रेमाची गरज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सर्वांना मानवतेचा संदेश देण्यासाठी जमिअत उलमा-ए-हिंदतर्फे रविवारी जालना शहरात काढण्यात आलेल्या मूक अमन मार्चला मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो मुस्लीम बांधवांनी यात सहभाग घेत सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला.
अमन मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागातील मुस्लीम बांधव सकाळपासून शहरात दाखल झाले होते. दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अमन मार्चला सुरुवात करण्यात आली. मार्चमध्ये सर्वात पुढे लहान मुले चालत होती.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्वयंसेवकांनी मानवी साखळी केल्याचे दिसून आले.हातात राष्ट्रीय एकता व सामाजिक एकतेचा संदेश देणारे फलक घेतलेल्या युवकांचा मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. ठिकठिकाणी पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. मार्चमध्ये सहभागी प्रत्येक जण शिस्तीचे पालन करताना दिसून आले.
कादराबाद, फूल बाजार, मामा चौक, गरीबशहा बाजार, मस्तगड, गांधीचमन मार्गे काढण्यात आलेल्या मार्चचे टॉऊन हॉल परिसरात सभेत रुपांतर झाले. या ठिकाणी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, सुधाकर निकाळजे, राजेंद्र राख, अब्दुल रशीद, जमाते इस्लामीचे अब्दूल मुजीब, अण्णा चितेकर यांनी मनोगत व्यक्त केले. राज्यमंत्री खोतकर म्हणाले, की स्वातंत्र्याच्या चळवळीत जमिअत उलमाचे मोठे योगदान राहिले आहे.
देशात आज सामाजिक सलोख्याची गरज आहे. जमिअत उलमाचे शहराध्यक्ष मुफ्ती रहेमान यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, की हा अमन मार्च सर्व जाती धर्मांचा आहे. देशात असहिष्णुता वाढत असून, वातावरण असुरक्षित बनत आहे. अमन मार्चच्या माध्यमातून देशात शांती, राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा आमचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष हसन काशमी, एकबाल पाशा यांनी मार्गदर्शन केले. या वेळी पावसासाठी सामुहिक प्रार्थना करण्यात आली. राष्ट्रगीतानाने अमन मार्चची सांगता झाली. या अमन मार्चसाठी मुफ्ती फहीम, शाहआलम खान, शेख महेमूद, माजेद शेख, अ‍ॅड. सय्यद अमजद, मोहसीन शेख, अख्तर शेख, आमर पाशा आदींनी पुढाकार घेतला.

Web Title:  The country needs peace and love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.