देशातील पहिल्या कर्करोग रुग्णालयाचा मान औरंगाबादला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2017 12:43 AM2017-07-10T00:43:59+5:302017-07-10T00:48:06+5:30

औरंगाबाद : औरंगाबादेतील कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्करोग संस्था आगामी दोन वर्षांत अत्याधुनिक उपचार आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज होणार आहे.

The country's first cancer hospital is Aurangabad | देशातील पहिल्या कर्करोग रुग्णालयाचा मान औरंगाबादला

देशातील पहिल्या कर्करोग रुग्णालयाचा मान औरंगाबादला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : औरंगाबादेतील कर्करोग रुग्णालय म्हणजेच राज्य कर्करोग संस्था आगामी दोन वर्षांत अत्याधुनिक उपचार आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज होणार आहे. केंद्र सरकारच्या निधीमुळे अत्याधुनिक प्रयोगशाळा, रक्तपेढी उभारण्यासह येथील डॉक्टर, तंत्रज्ञ, निवासी डॉक्टर आणि आवश्यक मनुष्यबळाचा प्रश्न सुटणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास संलग्न आणि वैद्यकीय महाविद्यालयाने चालविलेल्या देशातील पहिल्या कर्करोग रुग्णालयाचा मानही औरंगाबादच्या कर्करोग रुग्णालयास मिळाला आहे, असे टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक (अकॅडमिक) डॉ. कैलास शर्मा म्हणाले.
मराठवाड्यातील गरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला आहे. या अंतर्गत केंद्र सरकारचा ४५ कोटी रुपये अनुदानाचा पहिला हप्ता मिळाला आहे. या निधीचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी डॉ. कैलास शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि.१०) कर्करोग रुग्णालयात बैठक होणार आहे. या बैठकीनिमित्त औरंगाबादेत दाखल झाल्यानंतर रविवारी (दि.९) त्यांनी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. कैलास शर्मा यांनी कर्करोग रुग्णालयाच्या आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल आणि पुढील दोन वर्षांत रुग्णालयाच्या विकासासंदर्भात संपादकीय विभागाशी यावेळी
संवाद साधला.
शहरातील विभागीय शासकीय कर्करोग रुग्णालय २१ सप्टेंबर २०१२ रोजी रुग्णसेवेत दाखल झाले. गेल्या पाच वर्षांत हजारो रुग्णांना येथील उपचारामुळे नवीन आयुष्य मिळाले. हे रुग्णालय सुरू होण्यासाठी अनेकांचे योगदान आहे. डॉ. शर्मा म्हणाले, क र्करोग रुग्णालय सर्जिकल, मेडिकल आॅन्कोलॉजी आणि रेडिओथेरपी या तीन मुख्य विभागांवर चालते. या तीन विभागांना पाठिंबा देणारे अ‍ॅनेस्थेशिया, पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, रक्तपेढी, मायक्रोबायोलॉजी, न्यूक्लिअर मेडिसिन असे आठ ते नऊ विभाग लागतात, तरच कर्क रोग रुग्णालय चालू शकते. वैद्यकीय महाविद्यालयाला जोडून कर्करोग रुग्णालय उभारले तर केवळ तीन मुख्य विभाग लागतात. उर्वरित आठ ते नऊ विभाग हे वैद्यकीय महाविद्यालयात असतात. त्यामुळे १०० खाटांचे कर्करोग रुग्णालय सहज उभे होते, ही माझी संकल्पना आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोग रुग्णालय बनवावे, असे मी शासनाला सांगितले आहे. याच संकल्पनेवर औरंगाबादेत इतके चांगले कर्करोग रुग्णालय उभारले गेले, असेही ते म्हणाले.
निधीचे योग्य नियोजन
इतर राज्यांमध्ये केवळ जमीन दाखवून राज्य कर्करोग संस्थेसाठी निधी मंजूर करून घेण्यात आला. आपल्याकडे राज्य सरकारने आधीच कर्करोग रुग्णालयासाठी गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे राज्य कर्करोग संस्थेची घोषणा होण्यासाठी पाठपुरावा केला. अखेर ही घोषणा झाली आणि काही दिवसांपूर्वीच कर्करोग रुग्णालयास केंद्र सरकारच्या वाट्यातील अनुदानाचा पहिला हप्ता प्राप्त झाला. या निधीचे नियोजन कसे करायचे, यासाठीच मी औरंगाबादेत आलो. निधीचा गैरवापर होऊ नये यासाठी आवश्यक कामांचा, यंत्रसामग्रींचा अधिष्ठातांच्या पातळीवर केवळ प्रस्ताव तयार होईल. त्यासंदर्भात शासनच निर्णय घेईल. कमीत कमी निधीत उच्च दर्जाची यंत्रसामग्री घेण्यासाठी टाटा हॉस्पिटलही लक्ष देईल, असेही ते म्हणाले.
अत्याधुनिक प्रयोगशाळा
कर्करोग रुग्णालयात अत्याधुनिक प्रयोगशाळा आवश्यक आहे. अशी प्रयोगशाळा कर्करोग रुग्णालयात सध्या नाही. बाहेरून तपासण्या कराव्या लागतात. त्यामुळे येथे अत्याधुनिक प्रयोगशाळा कार्यान्वित करणार आहोत. बाहेरून आठ हजार रुपयांमध्ये होणारी चाचणी या ठिकाणी होईल. जीवनदायी योजनेत त्याचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे डॉ. शर्मा म्हणाले.
संचालकपदाची निर्मिती
अधिष्ठाता सर्वत्र लक्ष ठेवू शकत नाही, त्यामुळे कर्करोग रुग्णालयासाठी प्राध्यापकस्तरावरील व्यक्तीस प्रमुख करावे, त्यासाठी संचालक, वैद्यकीय अधीक्षक पदांची निर्मिती करण्यासंदर्भात ठरवावे, असा प्रस्ताव द्यावा, असे सोमवारी (दि.१०) होणाऱ्या बैठकीत सांगणार असल्याचे डॉ. शर्मा म्हणाले.
सेवेची भावना
माझे वैद्यकीय शिक्षण (एमडी) औरंगाबादेतच झालेले आहे, त्यामुळे या ठिकाणी सेवा देण्याचे माझेही कर्तव्य आहे. याच भावनेतून सर्जिकल आॅॅन्कोलॉजी आणि मेडिकल आॅन्कोलॉजी यांना चार-चार महिन्यांसाठी कर्करोग रुग्णालयात नियुक्ती दिली आहे. काम येथे करीत असले तरी वेतन आम्ही देत आहोत. आज ते खूप चांगले काम करीत असून, शस्त्रक्रियांचे प्रमाणही वाढले आहे.

Web Title: The country's first cancer hospital is Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.