देशातील पहिले खुले तोफ संग्रहालय देवगिरी किल्ल्यावर, किती तोफा माहितेय?
By संतोष हिरेमठ | Published: August 19, 2024 07:44 PM2024-08-19T19:44:58+5:302024-08-19T19:45:49+5:30
प्रवेशद्वारापासून शेवटच्या टोकापर्यंत तोफाच तोफा
छत्रपती संभाजीनगर : तुम्ही कधी ना कधी देवगिरी किल्ल्यावर गेले असतालच; पण या किल्ल्यावर किती तोफा आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? देशातील पहिले खुले तोफ संग्रहालय याच ठिकाणी असून, अगदी किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून तर उंच अशा शेवटच्या टोकांपर्यंत तुम्हाला तोफाच तोफा पाहायला मिळतील.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणतर्फे ऐतिहासिक देवगिरी (दौलताबाद) किल्ल्यावर तोफांचे भव्य असे संग्रहालय साकारण्यात आले आहे. चांद मीनारसमोरील जागेत हे संग्रहालय आहे. देशातील अशाप्रकारचे पहिले खुले तोफ संग्रहालय असल्याचे सांगितले जाते.
किल्ल्यावर किती तोफा?
देवगिरी किल्ल्यावर एकूण २६९ ताेफा आहेत. काही तोफा प्रवेशद्वाराजवळ (महाकोट) आहेत. चांद मीनारसमोर खुल्या संग्रहालयात ५३ तोफा आहेत. किल्ल्यावर ठिकठिकाणी बुरुजावर तोफा आहेत. काही तोफा किल्ल्याच्या आतमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. किल्ल्याच्या सर्वांत वरच्या भागात काळा पहाड तोफ आहे.
किती दूरपर्यंत मारा, कोणत्या धातूचा वापर?
साडेतीन कि.मी. अंतरापासून तर ९ कि.मी. अंतरापर्यंत मारा करणाऱ्या तोफ देवगिरी किल्ल्यावर आहेत. लोखंडी ओतीव तोफा, पंचधातूच्या ओतीव तोफा, मिश्र पद्धतीने बनविलेल्या बांगडी तोफा दिसून येतात.
या तोफेचे वजन तब्बल १४ टन
देवगिरी किल्ल्यावर सर्वाधिक म्हणजे १४ टन वजनाची एक तोफ आहे. ही तोफ म्हणजे मेंढा तोफ. या तोफेची ९ कि.मी. अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. ही तोफ पंचधातूपासून बनविण्यात आल्याचे गाइड सांगतात.
पर्यटकांमध्ये उत्सुकता
किल्ल्यावर एकूण २६९ तोफा आहेत. या तोफांविषयी पर्यटकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. तोफ कशी बनविली, किल्ल्यावर कशी आणली, किती वजन आहे, असे अनेक प्रश्न पर्यटक विचारतात.
- सिराज शेख, गाइड, देवगिरी किल्ला