भरधाव ट्रकने दाम्पत्याला उडवले, १५ फूट फरफटत नेल्याने महिलेचा जागीच मृत्यू, पती जखमी

By सुमित डोळे | Published: June 12, 2024 11:38 AM2024-06-12T11:38:26+5:302024-06-12T11:39:06+5:30

आकाशवाणी चौकात 'सिग्नलच्या गोंधळामुळे पुन्हा मृत्यू', शेकडो नागरिकांना जीव मुठीत धरून ओलांडावा लागतो रस्ता

Couple crushed by speeding truck, woman dies on the spot after being dragged 15 feet, husband seriously injured | भरधाव ट्रकने दाम्पत्याला उडवले, १५ फूट फरफटत नेल्याने महिलेचा जागीच मृत्यू, पती जखमी

भरधाव ट्रकने दाम्पत्याला उडवले, १५ फूट फरफटत नेल्याने महिलेचा जागीच मृत्यू, पती जखमी

छत्रपती संभाजीनगर : नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक झालेला आकाशवाणी चौक ओलांडताना सुसाट गॅस टँकरच्या धडकेत अनिता यतीराज बाहेती (६५, रा. डोंबिवली) या जागीच ठार झाल्या. मंगळवारी सायंकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अनिता पती यतीराज यांच्यासह महेशनगरकडून आकाशवाणीच्या दिशेने रस्ता ओलांडत होत्या. त्याच वेळी मोंढ्याकडून सेव्हनहिलकडे जाणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. यात यतीराज यात गंभीर जखमी झाले.

मूळ धुळ्याचे असलेले बाहेती कुटुंब नोकरीनिमित्त मुंबईच्या डोंबिवलीत स्थायिक झाले होते. बाहेती यांचे बहुतांश नातेवाईक शहरात वास्तव्यास आहेत. महेशनगर येथील एका नातेवाइकाच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी बाहेती दाम्पत्य मंगळवारी पहाटे रेल्वेने शहरात आले होते. दुपारपर्यंत साडूकडे थांबून ते महेशनगरच्या नातेवाइकाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. दिवसभर नातेवाईक, मित्र परिवारासोबत वेळ घालवला. रात्री ९ वाजेची परतीची रेल्वे असल्याने बाहेती ७.३० वाजता महेशनगरमधून आकाशवाणी चौकात आले. रिक्षासाठी रस्ता ओलांडत असताना गॅस सिलिंडर ट्रक (एम एच २६ - एच -५९८३) चालकाने त्यांना उडवले. हा अपघात इतका भीषण होता की ट्रक चालकाने अनिता यांना अक्षरश: १५ ते २० फूट फरपटत नेले. त्यानंतर ट्रक सोडून चालक पसार झाला.

मूळ धुळ्याचे, मुली पुण्याला
मूळ धुळ्याचे असलेले यतीराज बाहेती नोकरीनिमित्त मुंबईला स्थायिक झाले होते. नाबार्डमधून ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या दोन विवाहित मुली पुण्याला स्थायिक झाल्या. त्यानंतर कधी मुंबई तर कधी मुलींकडे दोघे राहायला जात होते. अपघातानंतर खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतरही यतीराज पत्नीविषयी विचारपूस करत हाेते.

पोलिसांना गांभीर्य कधी येणार?
पाच वर्षांपूर्वी आकाशवाणी व अमरप्रीत चौकात सरळ वाहतूक ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. चौक बॅरिकेड्सने बंद करण्यात आला. मात्र, उपाययोजना न राबवताच चौक बंद केल्याने अपघातांची मालिका सुरू झाली. पादचाऱ्यांना ओलांडण्यासाठी ठराविक वेळेला सिग्नल सुरू करण्यात आले. त्यामुळे वाहनचालकांचाही गोंधळ उडतो. बॅरिकेड असल्याने वाहनचालक थांबत नाहीत. परिणामी, नागरिक जीव मुठीत धरून रस्ता ओलांडतात. यातून अपघात होतात. वाहनांचा वेग अधिक असल्याने मृत्यूची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, पोलिसांना गांभीर्य येणार कधी, असा संतप्त प्रश्न नागरिक करत आहेत.

Web Title: Couple crushed by speeding truck, woman dies on the spot after being dragged 15 feet, husband seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.