दुचाकीला वाचविताना शिवशाहीची कारला धडक; मुलासमोर आई-वडिलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 01:15 PM2023-06-06T13:15:16+5:302023-06-06T13:23:47+5:30
समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात शिवशाहीने कारला धडक दिल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
वैजापूर : शिवशाही बसने कारला दिलेल्या जोराच्या धडकेत कारमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा व सून गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वैजापूर - गंगापूर रस्त्यावरील चोरवाघलगावजवळ घडली. हंसराज नामदेव पवार (वय ६२) व सुलोचना हंसराज पवार (वय ५९, रा. मर्चंट कॉलनी, वैजापूर) अशी मृतांची नावे आहेत. तर मनोज हंसराज पवार व माया मनोज पवार अशी जखमींची नावे आहेत.
वैजापूर येथील हंसराज पवार हे औरंगाबाद जिल्हा बँकेतील सेवानिवृत्त शाखाधिकारी होते. २०१९ मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले होते. सोमवारी कुटुंबातील चारही सदस्य कारने (एमएच ०४ जिथे २५९५) नगर येथील रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. तेथून परत येत असताना गंगापूर रस्त्यावर चोरवाघलगावजवळ त्यांच्या कारला नाशिक ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या शिवशाही बसने (एमएच ०६ बीडब्ल्यू ०४९१) जोराची धडक दिली. समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या नादात शिवशाहीने कारला धडक दिल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अपघाताची तीव्रता एवढी होती की, कारचा चेंदामेंदा झाला. हंसराज पवार व सुलोचना पवार हे जागीच ठार झाले, तर त्यांचा मुलगा मनोज व सून माया हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करीत जखमींना वैजापूरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले. हंसराज हे मूळ नांदगाव तालुक्यातील बांधटाकळी येथील रहिवासी होते. या अपघातामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.