गुन्हेगारांचे धाडस वाढले; थर्टी फर्स्टच्या बंदोबस्तावरून घरी जाणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करून लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 17:20 IST2021-01-01T17:13:07+5:302021-01-01T17:20:34+5:30
A police constable was beaten and robbed in Aurangabad : थर्टी फर्स्टचा बंदोबस्त ते सूतगिरणी चौकात राखीव अंमलदार म्हणून करीत होते.

गुन्हेगारांचे धाडस वाढले; थर्टी फर्स्टच्या बंदोबस्तावरून घरी जाणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करून लुटले
औरंगाबाद: कामावरून घरी जाणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला तीन जणांनी रस्त्यात अडवून बेदम मारहाण करून त्यांच्या खिशातील १ हजार ४६० रुपये हिसकावून घेतले. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी कॉन्स्टेबलच्या मोटारसायकलवर दगड घालून नुकसान केले. आरोपी त्यानंतर दुचाकीवर बसून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या काही तासात एका आरोपीला अटक केली.
नितीन भास्कर वक्ते (वय ३०), गौतम राम कदम (४०) आणि दीपक रमेश वक्ते (तिघे रा. संसार नगर ) अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मुळे पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. थर्टी फर्स्टचा बंदोबस्त ते सूतगिरणी चौकात राखीव अंमलदार म्हणून करीत होते. रात्री दीड वाजेच्या सुमारास मुळे हे त्यांची मोटरसायकल घेऊन नंदनवन कॉलनीतील घराकडे अदालत रोड मार्गे जात होते. दोन वाजेच्या सुमारास जीवन विमा कार्यालयाजवळ त्यांच्यामागून आलेल्या ट्रिपल सीट दुचाकीस्वारांनी त्यांना थांबविले.
दुचाकीवरून उतरलेल्या आरोपींनी अचानक त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तर दुसऱ्याने त्यांचे दोन्ही हात मागून पकडले. तिसऱ्याने मुळे यांच्या खिशातील रोख १ हजार ४६० रुपये बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला. मुळे यांनी प्रतिकार करताच दुसऱ्या आरोपीने दगड उचलून त्यांच्या कानाजवळ मारला आणि खाली पाडले. यात मुळे जखमी झाले. यावेळी त्यांचे पैसे लुटारुंनी हिसकावून घेतले. अन्य एकाने त्यांच्या दुचाकीवर दगड घालून दुचाकीच्या मडगार्डचे नुकसान केले. यानंतर आरोपी दुचाकीवर बसून पसार झाले. खाली पडल्यामुळे यांनी लगेच पोलीस नियंत्रण कक्ष आणि सपोनि घनशाम सोनवणे यांना फोन करून घटनेची माहिती कळविली. दुचाकीचा क्रमांक त्यांनी पाहिला होता.
एका आरोपीला लागलीच घेतले ताब्यात
गस्तीवरील पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने आरोपींचा शोध सुरू केला असता संसारनगरात आरोपी नितीनला पोलिसांनी पकडले. त्याने उर्वरित आरोपींची नावे सांगितली. त्यापैकी एकजण जालना येथे पळून गेला. तर दुसरा घरात लपून बसला आणि स्वतः एसपीओ असल्याचे पोलिसांना आतून सांगायचा. मात्र, तो दार उघडत नव्हता. त्यावेळी गल्लीत लोकांची गर्दी झाल्यानंतर पोलीस तेथून निघून गेले.