भू-माफियांचे धाडस वाढले; बनावट नकाशा, शिक्के वापरून जमीन हडपण्याचा प्रयत्न उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 02:11 PM2021-12-03T14:11:46+5:302021-12-03T18:30:00+5:30
सातारा पोलीस ठाण्यात समीर भंडारी, संभाजी अतकरे, विजयकुमार पाटणींसह पाचजणांवर गुन्हा दाखल
औरंगाबाद : सातारा परिसरातील गट नंबर २२० मधील जमिनीचा बनावट नकाशा तयार करून तो सिडको कार्यालयास सादर करीत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक संभाजी अतकरे, समीर भंडारी, विजयकुमार पाटणी, जितेंद्र ढाकरे आणि अजय पवार यांच्याविरोधात सातारा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला गेला आहे.
भाग्यदीप औद्योगिक सहकारी संस्थेचे अध्यक्ष भगवान बाबासाहेब गोर्डे (रा. एन ११, नवजीवन कॉलनी, हडको) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या संस्थेची सातारा परिसरातील गट नं. २२५ मध्ये दीड एकर आणि गट नं. २१९ मध्ये पावणेदोन एकर जमीन आहे. या जमिनीच्या उत्तर व पश्चिमेस गट नं. २्२० मध्ये श्री गुरुदेव बिल्डर्स ॲड डेव्हलपर्स संस्थेची जमीन आहे. या संस्थेत विजयकुमार पाटणी यांच्यासह इतर भागीदार आहेत. या गट नं.मध्ये २९ हजार ७०० चौरस मीटर जमीन रहिवासी वापराकरिता सिडकोकडून रेखांकन मंजूर केलेले आहे. २०१७ मध्ये श्री गुरुदेव संस्थेच्या भागीदारांनी गोर्डे यांच्या संस्थेच्या मालकीच्या जागेत तार कंपाऊंड बांधण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना संस्थेतील सदस्यांनी तार कंपाऊंड करण्यापासून रोखले होते.
श्री गुरुदेव संस्थेच्या सदस्यांनी आमच्याकडे सिडको कार्यालयाने रेखांकन मंजूर केलेले आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर एन.ए. असल्याचे सांगितले.
यानंतर गाेर्डे यांनी सिडको कार्यालयाकडून रीतसर कार्यवाही करून रेखांकन केलेली कागदपत्रे मागितली. त्यामध्ये बनावट नकाशा तयार करून सादर केल्याचे निदर्शनास आले. यानंतर नगररचना विभाग, भूमी अभिलेख कार्यालयाने जमिनीची रीतसर मोजणी केली. त्यामध्ये श्री गुरुदेव बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स संस्थेच्या सदस्यांनी संगनमत करून बनावट शिक्क्यांच्या आधारे नकाशा तयार करून जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याकरिता भाग्यदीप औद्योगिक सहकारी संस्थेने न्यायालयात प्रकरण नेले. न्यायालयाने गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार विजयकुमार पाटणी, संभाजी अतकरे, समीर भंडारी, जितेंद्र ढाकरे आणि अजय पवार यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.