अशीलाचे वारंट पोलिसांना न देण्यासाठी वकिलाकडून घेतली लाच; कोर्टातील शिपाई एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 07:32 PM2021-01-22T19:32:18+5:302021-01-22T19:39:01+5:30
एसीबीने अदालत रोडवरील हॉटेल अदिती येथे लावलेल्या सापळ्यात शिपाई अडकला
औरंगाबाद : अशीलाविरुध्दचे जेल वॉरंट पोलिसांना देण्यापासून थांबविल्यामुळे मोबदला म्हणून वकिलांकडून एक हजार रुपयांची लाच घेताना न्यायालयातील शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.
राहुल अनंतराव पांचाळ (वय ३२) असे अटकेतील शिपायाचे नाव आहे. प्रथमवर्ग न्यायालयाने तक्रारदार त्यांच्या अशीलाविरुद्ध जेल वारंट काढण्याचे आदेश दिले होते. हे वारंट पोलिसांना देण्यापासून थांबविल्याने बक्षीस म्हणून १ हजार रुपये लाच त्यांनी मागितली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोदविली.
शुक्रवारी पोलीस निरीक्षक रेशमा सौदागर आणि कर्मचाऱ्यानी अदालत रोडवरील हॉटेल अदिती येथे लावलेल्या सापळ्यात पांचाळ याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.