बीडच्या कोविड केअर सेंटरमध्ये सुविधा कमी अन् त्रास जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 06:52 PM2020-11-27T18:52:11+5:302020-11-27T19:05:52+5:30
एप्रिलमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर जुलै ते ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या गतीने वाढत गेली.
बीड : येथील शासकीय आयटीआयमधील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण व चाचणी करण्यासाठी गेलेल्या संशयितांना सुविधा कमी आणि त्रासच जास्त सहन करावा लागत आहे. एखाद्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर धक्का बसल्याने तो घाबरून जातो, असे असतानाही येथील डॉक्टर, कर्मचारी अहवाल देण्यास दिरंगाई करीत असल्याच्या तक्रारी नातेवाईकांनी केल्या आहेत. विशेष म्हणजे, येथे कसलेच नियोजन नसल्याचे सांगण्यात येत आहे.
एप्रिलमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर जुलै ते ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या गतीने वाढत गेली. त्यामुळे रुग्णालयातील खाटा संपल्या होत्या. हाच धागा पकडून लक्षणे नसणाऱ्यांसाठी शासकीय आयटीआयमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले. येथे डॉक्टर, हॉस्पिटल मॅनेजर, स्टोअर किपर, परिचारिका, कक्षसेवक असे कर्मचारी नियुक्त केले. सर्व काही असतानाही केवळ ढिसाळ नियोजनामुळे सामान्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना येथे त्रास सहन करावा लागत आहे.
चाचणी झाल्यानंतर बाधित रुग्णाला तत्काळ आयसोलेट करणे गरजेचे असते. अनेकांची प्रकृती चिंताजनक असते तर काहींची अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर घाबरून चिंताजनक बनते.तरीही येथील डॉक्टर, कर्मचारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. तपासणी तर दूरच परंतु सहकार्यही करत नाहीत. तसेच रुग्णालयात दाखल होण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णाचा अहवालही देत नसल्याच्या तक्रारी नातेवाईकांनी केल्या आहेत. सेवा द्यायच्या सोडून मोबाईल, हेडफोनमध्ये मग्न राहणे, इतरत्र फिरणे व गप्पा मारण्यातच कर्मचारी व्यस्त असल्याचेही सांगण्यात येत आहे. अशा हलगर्जीपणा करणाऱ्या व ढिसाळ नियोजन करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
डीडी, डीएचओ, प्रमुखांचेही कोणी ऐकेना
नातेवाईकांनी येथील ढिसाळ कारभाराबद्दल उपसंचालक डॉ.एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांना कल्पना दिली. तसेच सेंटरचे प्रमुख डॉ.अमित बायस यांनाही कळविले. परंतु तरीही काहीच फरक पडला नाही. यावरून येथील गलथान कारभाराचा प्रत्यय येतो.
आयटीआयमधील सीसीसीबद्दल तक्रार आली आहे. याची चौकशी करण्यास सांगितले आहे. दोन दिवसांत अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल.
- डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड