विनापरवाना कपाशीचे बियाणे विकणाऱ्यावर छापा
By बापू सोळुंके | Published: May 24, 2024 10:07 PM2024-05-24T22:07:29+5:302024-05-24T22:07:44+5:30
कृषी विभागाची वैजापुरात मध्यरात्री कारवाई
बापू सोळुंके, छत्रपती संभाजीनगर: विनापरवाना आणि जादा दराने कपाशीचे बियाणे विक्री करणाऱ्या एका जणाच्या घरावर कृषी विभागाने छापा मारून कपाशीच्या संकेत वाणाचे बियाणे जप्त केली. ही कारवाई २४ मे रोजी वैजापूर येथील समर्थनगरात करण्यात आली. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर काकासाहेब काळे (रा. गोंडेगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी सांगितले की, वैजापूर येथील स्वामी समर्थनगर येथील एका घरातून अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संकेत कपाशीच्या वाणाची अनधिकृत आणि जादा दराने विक्री होत असल्याची माहिती जिल्हा गुण नियंत्रण विभागाला प्राप्त झाली होती. यानंतर वैजापूर येथील पंचायत समितीमध्ये कार्यरत कृषी अधिकारी जगदिप वाघमारे आणि जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक तसेच उपविभागीय कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी पोलिसांसह संशयित काळे यांच्या घरावर गुरूवारी मध्यरात्री छापा मारला. तेव्हा तेथे सुमारे १९ हजार ८ रुपये किंमतीची संकेत कपाशीच्या वाणाची २२ पाकिटे आढळून आली.
या बियाणांविषयी अधिकाऱ्यांनी काळे याच्याकडे विचारपूस केली असता त्याने ४५ पाकिटे त्याने कोपरगाव येथील कृषी दीपक मौनगिरी ॲग्रो या वितरकाकडून आणल्याचे आणि वैजापूर तालुक्यातील स्वराज्य ॲग्रो एजन्सी रोटेगाव यांना देण्यासाठी होती, असे सांगितले. यापैकी २३ पाकिटे त्याने शेतकऱ्यांना विक्री केल्याची कबुली दिली. यावेळी त्याने स्वराज्य एजन्सीचे बील बुक सादर केली. मात्र कृषी दीपक मौनगिरी ॲग्रो यांचे बील त्याच्याकडे नव्हते. आरोपी काळे याच्याकडे कापूस बियाणे विक्री आणि साठवणूक करण्याचा परवाना नाही. असे असताना त्याने विना परवाना तसेच जादा दराने कापूस बियाणे विक्री केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याने याप्रकरणी वाघमारे यांच्या तक्रारीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.