मग्रारोहयोत सीईओंचा कारवाईचा दणका
By Admin | Published: March 15, 2016 12:50 AM2016-03-15T00:50:27+5:302016-03-15T01:01:38+5:30
हिंगोली : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामांच्या तक्रारीचा निपटारा केला जात आहेत. तीन गावांच्या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांनी
हिंगोली : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामांच्या तक्रारीचा निपटारा केला जात आहेत. तीन गावांच्या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांनी कारवाईचे हत्यार उपसले आहे. यात एक अभियंता, ग्रामसेवक, दोन सरपंच व ग्रामरोजगारांवर कारवाई केली असून एका प्रकरणात बीडीओपासून ग्रामरोजगार सेवकांपर्यंतच्या सर्वांना नोटिसा बजावल्या आहेत.
कळमनुरी तालुक्यातील बोथी देववाडी - माळधावंडा पाणंदरस्त्याच्या कामाबाबत श्यामराव मुकाडे व इतर मजुरांनी तक्रारी केल्या होत्या. याबाबत तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशीही केली होती. सदर पाणंद रस्त्यांच्या कामास प्रशासकीय मान्यता नसतानाच ग्रा. पं. ने काम केले होते. तर मजुरांचे हजेरीपत्रक भरले असून सदर कामांचे २४ हजार ५३२ रुपये मूल्यांकन केले होते. यात संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा बजावून खुलासे मागविले होते. मात्र ते असमाधानकारक असल्याने संबंधित शाखा अभियंता ए. एन. पतंगे व तत्कालीन ग्रामसेवक जे. जी. काकडे यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
याच प्रकरणात ग्रामरोजगारसेवक संतोष खंदारे यास पदावरून कमी केले तर सरपंच निर्मला भुजंग डुकरे यांच्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यास गटविकास अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
डिग्रसवाणीत फौजदारी
हिंगोली तालुक्यातील डिग्रसवाणी येथे मग्रारोहयोच्या कामांवर मयत, अपंगांची हजेरी दाखविली होती. रमेश आढळकर यांनी केलेल्या तक्रारीनंतर चौकशीतही हा प्रकार समोर आला. त्यामुळे संबंधित सरपंच व ग्रामसेवकांकडून अपहारित रक्कम वसूल करण्यात आली आहे. यात शासनाची फसवणूक केल्याचे मात्र समोर आले. शासकीय रक्कमेचा अपहार, खोटी अभिलेखे तयार व सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी वरील दोघांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश बीडीओंना दिला.
(जि.प्र.)
औंढा तालुक्यातील तुर्कपिंप्री येथे नुकताच स्वच्छता विभागाने कार्यक्रम घेवून गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त झाल्याचा उत्सव साजरा केला. या कार्यक्रमाला खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांनी हजेरी लावली. मात्र त्यावेळी ग्रामसेवक ए.ए. जाधव तेथे हजर नसल्याचे
आढळून आले. या उत्सवाच्या निमित्ताने आर्दड यांनी गावफेरी केली होती. तेव्हा विविध भागात त्यांना साफसफाई आढळून आली नाही. याबाबत त्यांनी ग्रामस्थांनाही विचारले तर काही कामेही अर्धवट असल्याचे दिसले. त्यावरून सीईओ आर्दड हे चांगलेच संतापले होते.
सेनगाव तालुक्यातील लिंगदरी येथे ६ डिसेंबर २0१४ रोजी नरेगा उपायुक्तांनी भेट दिली होती. कामाबाबत नाराजी व्यक्त करून चौकशी प्रस्तावित केली होती. जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल आल्यानंतर यात आर्थिक अनियमितता आढळून आली.
४यात संबंधित अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करून आर्थिक नुकसानीची वसुली करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. यात नमुना क्र.४ प्राप्त होण्यापूर्वीच तत्कालिन गटविकास अधिकाऱ्यांनी कार्यारंभ आदेश निर्गमित केल्याचे दिसून येते.
४मागणी नसलेल्यांना काम, मजुरांच्या स्वाक्षऱ्या नसणे आदी बाबी आढळल्या. यात संबंधित तत्कालीन गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याने कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.