खडीक्रशरमुळे मिरकळा, तळेवाडीतील घरांना तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:07 AM2017-10-30T00:07:34+5:302017-10-30T00:07:40+5:30
तालुक्यातील तळेवाडी, मिरकाळा परिसरातील खडीक्रशरमुळे नागरिकांच्या घराला तडे जात आहेत.
विष्णू गायकवाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यातील तळेवाडी, मिरकाळा परिसरातील खडीक्रशरमुळे नागरिकांच्या घराला तडे जात आहेत. तसेच धुळीमुळे नागरिकांना दमा, मुतखडा यासारखे गंभीर आजार जडले असून, आरोग्य धोक्यात आले आहे. पिकांची पत ही ढासळली असल्याने शेतक-यांना फटका बसत आहे. याठिकाणी घेण्यात येणा-या ब्लास्टींगच्या आवाजाने लहान मुलांमध्ये भितीचे वातावरण आहे. खडीक्रशर चालकाच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार करण्यास धजावत नसल्याचे बोलले जात आहे. याकडे तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गेवराई तालुक्यातील गढी जवळील तळेवाडी, मिरकाळा येथे आठ खडीक्रशर मागील काही वषार्पासून सुरु आहेत. याठिकाणी खडीक्रशरसाठी आवश्यक असलेले गौणखणीज आहे. राष्ट्रीय महामागार्पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तळेवाडी दरम्यान तसेच गावाभोवती हे खडीक्रेशर आहेत. याठिकाणी ब्लास्टींगच्या घेताना मोठा आवाज होत असल्याने तळेवाडी, मिरकाळा परिसरात असलेल्या गढी, खांडवी, शिंदेवाडी, खांडवी तांडा, गढी कारखाना काँलनी आदी दहा-बारा गावांना हादरा बसून घरांना तडे तसेच छतांचे तुकडे खाली पडत आहेत. यामध्ये हनुमान यमगर, उध्दव यमगर, ख्रोबाजी यादव आदीसह अनेकांच्या घरांना तडे जावून भिंतीला भेगा पडल्या आहेत.
खडीक्रशर हे गावापासून किमान चार-पाच किलोमीटर अंतरावर असणे आवश्यक आहे. मात्र हे खडीक्रशर गावालगत असल्याने ब्लास्टींग वेळेस दगडाचे तुकडे उडून गावात येत आहेत. यामुळे देखील नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच धुळीमुळे वातावरण प्रदूषित होण्याबरोबरच परिसरातील अनेक नागरिकांना नागरिकांना दमा, मुतखडा यासारखे गंभीर आजार जडले आहेत. पिकांवरही मोठ्या प्रमाणात धूळ बसून पिकांची पत ही ढासळली आहे. दिवस-रात्र केव्हाही होणाºया ब्लास्टींगच्या आवाजाने लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, खडीक्रशर चालकाची परिसरात मोठी दहशत आहे. त्यामुळे नागरिक तक्रार करण्यास धजावत नसल्याचे येथील नागरिकांमधून बोलले जात आहे. याकडे तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.