फळांचे क्रेट ठेवतात महिलांच्या शौचालयात, पालेभाज्यांवर मारले जाते तेथीलच पाणी
By प्रशांत तेलवाडकर | Published: May 27, 2024 12:22 PM2024-05-27T12:22:54+5:302024-05-27T12:23:28+5:30
दर्गा चौकातील रविवारच्या आठवडी बाजारात ग्राहकांच्या जिवाशी खेळ
छत्रपती संभाजीनगर : महिलांच्या शौचालयात ठेवलेले प्लास्टिकचे क्रेट रविवारी बाहेर काढण्यात आले व हातगाडीद्वारे विक्रेत्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. त्या क्रेटमध्येच फळे ठेवून दिवसभर विक्री करण्यात आली.... पुरुषांच्या शौचालयालगतच ठेवलेल्या ड्रममधील पाणी भाजीविक्रेत्यांना विकण्यात आले... भाजीपाला विक्रेत्याने त्याच पाण्यातून पालेभाज्या बुचकळून विक्रीला ठेवल्या.... हा प्रकार मुंबईतील नव्हे; तर आपल्याच शहरातील दर्गा चौकात रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातील आहे. ग्राहकांच्या जिवाशी हा खेळ खेळला जातो... याचा पर्दाफाश लोकमतने केला.
रविवारच्या आठवडी बाजारात ताजा भाजीपाला मिळतो. घरापर्यंत येणाऱ्या हातगाडीवाल्यांपेक्षा स्वस्त भाजीपाला मिळतो. यामुळे शहानूरमियाँ दर्गा परिसरातील नागरिकच नव्हे तर पीर बाजार, ज्योतीनगर, झांबड इस्टेट, काल्डा कॉर्नर, उल्कानगरी, शिवाजीनगर, बीड बायपास येथील हजारो लोक दर्गा परिसरात भरणाऱ्या आठवडी बाजारात येत असतात. पण या पैशाच्या बदल्यात आपण घरी आजार घेऊन चाललोय, याची कल्पनाच त्यांना नसते.
शौचालयालगतच्या ड्रममधील पाणी भाज्यांसाठी
श्रीहरी पॅव्हेलियनच्या समोरील मोकळ्या जागेत जिथे आठवडी बाजार भरला जातो. त्याच्या पश्चिम बाजूला शौचालय उभारण्यात आले आहे. पुरुषांच्या शाैचालयालगतच पाण्याने भरलेले दोन ड्रम ठेवण्यात आले आहे. कधी नळाचे तर कधी टँकरने आणून पाण्याने ते ड्रम भरले जातात. हेच पाणी शौचालयास वापरले जाते व तेच पाणी भाजीविक्रेत्यांनाही विकले जाते. पाणी विकण्यासाठी खास माणूस येथे लावण्यात आला असून तो माणूस १० रुपयांत हंडाभर पाणी भाजीविक्रेत्यांना विकताना दिसून आला. विक्रेते भाज्या ताज्या ठेवण्यासाठी तेच पाणी दिवसभर भाज्यांवर शिंपडत असल्याचे बघण्यास मिळाले. दिवसभरात ५० भाजीविक्रेत्यांना हंडाभर पाणी विकत असल्याचे विक्रेत्याने सांगितले.
धक्कादायक शौचालयात ठेवले जाते क्रेट
फळ ठेवण्यासाठी प्लास्टिकच्या क्रेटचा वापर केला जातो. मात्र, रविवारचा आठवडी बाजार संपला की, हे रिकामे क्रेट तेथील महिलांच्या शौचालयात नेऊन ठेवले जातात. सदर प्रतिनिधीने पाहिले की, सकाळी ८.४१ वाजता एक जण हातगाडी घेऊन आला व त्याने महिलांच्या शौचालयात जाऊन २० ते २५ क्रेट आणले व हातगाडीवर ठेऊन ते फळ विक्रेत्यांना नेऊन दिले. विक्रेत्यांनी त्याच क्रेटमध्ये आंबे ठेवून दिवसभर विकले.