औरंगाबादेत हॉकर्स झोन तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:06 AM2018-02-15T00:06:40+5:302018-02-15T00:06:47+5:30
हॉकर्स झोन स्थापन करण्यापूर्वीच महापालिकेने खाजगी कंत्राटदारांमार्फत शहरातील हॉकर्स, फेरीवाल्यांकडून दरमहा भाडे वसुलीची तयारी सुरू केली आहे. यासंबंधीचा ठराव गुरुवारच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला आहे. या ठरावाला आज व्यापारी महासंघाने कडाडून विरोध दर्शविला. शहरातील ५० हजार हातगाडीचालकांसाठी स्वतंत्र हॉकर्स झोन स्थापन करा, या मागणीचे निवेदन महापौर नंदकुमार घोडेले यांना देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : हॉकर्स झोन स्थापन करण्यापूर्वीच महापालिकेने खाजगी कंत्राटदारांमार्फत शहरातील हॉकर्स, फेरीवाल्यांकडून दरमहा भाडे वसुलीची तयारी सुरू केली आहे. यासंबंधीचा ठराव गुरुवारच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला आहे. या ठरावाला आज व्यापारी महासंघाने कडाडून विरोध दर्शविला. शहरातील ५० हजार हातगाडीचालकांसाठी स्वतंत्र हॉकर्स झोन स्थापन करा, या मागणीचे निवेदन महापौर नंदकुमार घोडेले यांना देण्यात आले.
मनपा प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर शहरातील ५० हजार हातगाड्यांना परवाने देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी बुधवारी सकाळीच व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष जगन्नाथ काळे यांच्या नेतृत्वाखाली महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेतली. शहरात स्मार्ट सिटीचा प्रकल्प राबविला जात असताना शहरातील मुख्य बाजारपेठ व इतर ठिकाणी हातगाडीचालकांना परवाने देण्याचा प्रस्ताव आश्चर्यजनक आहे. व्यापाºयांना व त्या भागात राहणाºया नागरिकांना विश्वासात न घेता कोणताही ठराव महापालिकेने पारित करू नये. शहरातील हॉकर्ससंदर्भात महापालिकेने धोरण निश्चित केले पाहिजे. त्यानंतरच महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहात योग्य तो ठराव पारित करण्यात यावा. शहरातील हॉकर्सबाबत महाराष्टÑ शासनाने निर्देश दिले आहेत. त्या निर्णयाप्रमाणे महानगरपालिकेत समिती गठीत केली आहे. त्यामध्ये व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी घेण्यात आले आहेत.
बैठकांमध्ये हॉकर्स झोन जाहीर करून हॉकर्स परवाने देण्याचे ठरलेले आहे. हॉकर्स परवाने देत असताना त्यामध्ये हातगाड्याचालकांना सामावून घेण्याच्या निर्णयाचा समावेश करावा. शहरातील हातगाड्यांमुळे व्यापाºयांना होणाºया त्रासाबद्दल यावेळी माहिती देण्यात आली.
शिष्टमंडळात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, सरचिटणीस लक्ष्मीनारायण राठी, अजय शहा, संजय कांकरिया, दीपक पहाडे, विजय जैस्वाल, अनिल चौथर, जयंत देऊळगावकर, गुलाम हक्कानी, सुभाष दरक, कचरू वेळंजकर, आदेशपालसिंग छाबडा आदींचा समावेश होता.
खुल्या जागांचा पर्याय
शहरातील अनेक खुल्या जागांवर महापालिकेला हॉकर्स झोन तयार करता येऊ शकतात. शहागंज मार्केट, औरंगपुरा, जि. प. मैदान, अशा कितीतरी मोकळ्या जागा उपलब्ध आहेत. तेथे महापालिकेने हॉकर्स झोन तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
शहरातील वाहतूकही सुरळीत राहील, व्यापाºयांनाही त्रास होणार नाही, असा पर्याय महासंघाने महापौरांसमोर ठेवला आहे. महापौरांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.