एका मोबाईलसाठी घेतला जीव!
By Admin | Published: June 2, 2016 01:10 AM2016-06-02T01:10:29+5:302016-06-02T01:21:20+5:30
औरंगाबाद : ‘मर्डर झोन’ म्हणून ओळखल्या जाऊ लागलेल्या बीड बायपास रोडवर २५ मे रोजी मारहाण करण्यात आलेल्या राजू शंकर बोबडे (३४, रा. चितेगाव) या तरुणाची मंगळवारी प्राणज्योत मालवली.
औरंगाबाद : ‘मर्डर झोन’ म्हणून ओळखल्या जाऊ लागलेल्या बीड बायपास रोडवर २५ मे रोजी मारहाण करण्यात आलेल्या राजू शंकर बोबडे (३४, रा. चितेगाव) या तरुणाची मंगळवारी प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे राजूच्या मृत्यूनंतर बारा तासांच्या आत या खुनाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले. केवळ एका मोबाईलसाठी ‘रेकॉर्ड’वरील आरोपी सय्यद सुभान सय्यद अली (१९, रा. गांधेली) याने हा खून केल्याचे निष्पन्न झाले. त्याला सिडको एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.
घटनेबाबत माहिती देताना गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी सांगितले की, राजू बोबडे हे चितेगाव येथील संभाजीराजे कारखान्यावर आॅपरेटर म्हणून नोकरीला होते. २५ मे रोजी औरंगाबादेतील एका दवाखान्यात भरती असलेल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी ते आले होते. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ते बीड बायपास रोडवरील बाळापूर फाटा परिसरात रस्त्याच्या कडेलाच त्यांची मोटारसायकल पडलेली आणि तेथून काही अंतरावर निर्जनस्थळी ते गंभीर जखमी अवस्थेत पडलेले असल्याची माहिती पोलिसांना समजली. माहिती मिळताच सिडको एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमी बोबडे यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात हालविले.
बोबडे यांच्या डोक्यावर दगडाने हल्ला केलेला होता. ते कोमात गेलेले होते. त्यामुळे हल्ला कुणी केला, का केला, याचा तपास लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मग पोलिसांनी तपासाची चके्र फिरविली. तपासासाठी गुन्हे शाखा आणि सायबर गुन्हे शाखेची विशेष पथके तैनात करण्यात आली होती. दरम्यान, अज्ञात हल्लेखोराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजू बोबडे यांचा अखेर मंगळवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यानंतर लक्ष्मण औटे (रा. अंतरवाली, पैठण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजूच्या मृत्यूप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध सिडको एमआयडीसी ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
मोबाईलमुळे पोलीस आरोपीपर्यंत...
मयत राजू बोबडे यांचा घटनास्थळाहून मोबाईल गायब झालेला होता. मारेकऱ्याने तो मोबाईल पळविला असावा, असा पोलिसांचा कयास होता अन् अखेर पोलिसांचा अंदाज खरा ठरला. बोबडे यांचा मोबाईल रेकॉर्डवरील आरोपी सय्यद सुभान सय्यद अली याच्याकडे असल्याची माहिती खबऱ्या आणि आधुनिक तंत्राच्या साह्याने सायबर शाखेने शोधून काढली. माहिती मिळताच बुधवारी सकाळी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक गजानन कल्याणकर, उन्मेष थिटे, फौजदार अनिल वाघ, नितीन आंधळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध घेऊन आरोपी सुभानला अटक केली.
मोबाईल देण्यास विरोध केल्यामुळे...!
अटकेनंतर ‘खाक्या’ दाखविताच आरोपी सुभानने तोंड उघडले. आपणच राजू बोबडे याचा खून केल्याची त्याने कबुली दिली. बोबडे हे मोटारसायकलवर बसून बायपास रोडने चितेगावकडे चालले होते. बाळापूर फाट्याजवळ ते लघुशंकेसाठी थांबले असावेत.
मोटारसायकल उभी करून ते रस्त्याच्या कडेला जाताच तेथे लुटमारीच्या उद्देशाने थांबलेल्या सय्यद सुभानने संधी साधली. तो धावत त्यांच्याकडे गेला आणि सुभानने त्यांचा मोबाईल हिसकावला. बोबडे यांनी प्रतिकार केला. सुभानने बाजूला पडलेला मोठा दगड उचलला आणि बोबडे यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. क्षणार्धात ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. नंतर आरोपी तेथून मोबाईल घेऊन पसार झाला.
कारागृहातून सुटताच पुन्हा केला गुन्हा
आरोपी सय्यद सुभान हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. आरोपीविरुद्ध मोबाईल चोरीचे दोन गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. तो गांजाच्याही आहारी गेलेला आहे. काही दिवसांपूर्वी उस्मानपुरा ठाण्याच्या हद्दीतून त्याने मोबाईल चोरी केला होता.
या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्या गुन्ह्यातून २२ मे रोजीच तो कारागृहातून सुटून बाहेर आला आणि त्याने पुन्हा हा गुन्हा केल्याचे उघडकीस आले, असे सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी सांगितले.