शहरात क्रेडाईच्या ‘ड्रीम होम’ प्रदर्शनाला उद्यापासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 01:05 AM2017-09-20T01:05:47+5:302017-09-20T01:05:47+5:30
क्रेडाईतर्फे २१ सप्टेंबरपासून ‘ड्रीम होम’ प्रदर्शन भरविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आपणास घर खरेदी करायचे आहे का, मग जरा थांबा. कारण, बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाईतर्फे २१ सप्टेंबरपासून ‘ड्रीम होम’ प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यात शहरातील नामांकित ६० पेक्षा अधिक बिल्डर्सचे रेरामध्ये नोंदणी झालेल्या गृहप्रकल्पांची एकाच छताखाली माहिती मिळणार आहे. एवढेच नव्हे तर नामांकित कंपन्यांचे बांधकाम साहित्य, अर्थसाहाय्य करणाºया बँका, पंतप्रधान आवास योजना आदींची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात येत असल्याने गृहइच्छुकांसाठी प्रदर्शन पर्वणीच ठरणार आहे.
क्रांतीचौक येथील मॅनोर लॉन्स येथे तब्बल ५० हजार चौरस फुटांवर भव्य प्रदर्शन मंडप उभारण्यात आला आहे. यात लहान-मोठे १०१ स्टॉल उभारले आहेत. २०१३ मध्ये ड्रीम होम प्रदर्शनाला सुरुवात झाली; पण यंदाचे स्वरूप भव्य आहे. यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत क्रेडाईचे अध्यक्ष रवी वट्टमवार यांनी सांगितले की, २१ रोजी सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन मनपाचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्या हस्ते होईल. नोटाबंदी, जीएसटी व रेराची अंमलबजावणी यामुळे या क्षेत्रात अस्थिरता निर्माण झाली होती. आता पुन्हा एकदा गृहइच्छुकांचा हक्काचे घर खरेदीकडे ओढा वाढला आहे. दसरा-दिवाळी व गृहइच्छुकांना घर खरेदीत वाव मिळावा, यासाठी प्रदर्शन भरविण्यात येत आहे. एकाच ठिकाणी ६० पेक्षा अधिक बिल्डर्सचे गृहप्रकल्प, आॅफिसेस, दुकाने, निवासी व व्यावसायिक भूखंडाची माहिती मिळणार असल्याने ग्राहकांचा पैसा व वेळ वाचणार आहे. सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील. गृहइच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नरेंद्रसिंग जबिंदा यांनी केले. यावेळी आशुतोष नावंदर, राज्य क्रेडाईचे उपाध्यक्ष प्रमोद खैरनार, माजी अध्यक्ष देवानंद कोटगिरे, पापालाल गोयल, जितेंद्र मुथा, संभाजी अतकरे, विकास चौधरी आदी बिल्डर्स उपस्थित होते.