१०० कोटींचा श्रेयवाद पेटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 01:04 AM2017-08-18T01:04:27+5:302017-08-18T01:04:27+5:30
शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची घोषणा २८ जून रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केल्यानंतर १५ आॅगस्ट रोजी शिवसेना नेते तथा पालकमंत्री रामदास कदम यांनी निधी माझ्यामुळेच आल्याचे जाहीर करून राजकीय श्रेयवादाला खतपाणी घातले.
विकास राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची घोषणा २८ जून रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केल्यानंतर १५ आॅगस्ट रोजी शिवसेना नेते तथा पालकमंत्री रामदास कदम यांनी निधी माझ्यामुळेच आल्याचे जाहीर करून राजकीय श्रेयवादाला खतपाणी घातले.
रस्त्यांची यादी अजून अंतिम होण्यात अनेक राजकीय अडथळे आहेत. महापालिका, जिल्हाधिकारी प्रशासन आणि पालिकेतील राजकारणाच्या कोंडीतून जेव्हा यादी अंतिम होईल. तेव्हा रस्त्यांच्या निविदांचा मार्ग मोकळा होईल; परंतु सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये १०० कोटींवरून जोरदार ‘राजकीय मंथन’ सुरू आहे. ५० दिवसांपासून त्या अनुदानातून किती रस्ते करायचे, कोणते रस्ते करायचे, याचा निर्णय होत नाहीये; परंतु मनपा सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई जोरदारपणे पेटली आहे.
रस्त्यांसाठी अनुदान मिळाल्याचे जाहीर झाल्यानंतर भाजपने शहरातील चौका-चौकात होर्डिंग्ज लावून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. शिवाय अनुदान जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या एकाही पदाधिकाºयाला बोलाविले नव्हते. या सगळ्या प्रकरणाची ‘सल’ शिवसेनेच्या मनात होती. त्यामुळे पालकमंत्र्यांनी भाजपच्या होर्डिंग्जबाजीचा समाचार घेत पालिकेला निधी देण्यासाठी आजवर मीच प्रयत्न करीत आलो आहे. यापुढेही प्रयत्न करीत असल्याचे बालाजीनगरमधील एका कार्यक्रमात जाहीर केले. दरम्यान महापौर भगवान घडमोडे म्हणाले, रस्त्यांबाबत शासन निर्णय घेणार आहे. श्रेयवादावर त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.