क्रिकेटपटू इम्रान पटेल मैदानातच कोसळला; निधनाने क्रिकेट जगतात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 21:25 IST2024-11-27T21:24:56+5:302024-11-27T21:25:08+5:30
इम्रान पटेल याच्या पश्चात आई, पत्नी, ३ मुली आणि भावंडे असा परिवार आहे.

क्रिकेटपटू इम्रान पटेल मैदानातच कोसळला; निधनाने क्रिकेट जगतात खळबळ
छत्रपती संभाजीनगर : गरवारे क्रिकेट स्टेडियमवर बुधवारी सायंकाळी सामन्यादरम्यान प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू इम्रान पटेल (वय ४०) मैदानातच कोसळला. त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याची प्राणज्योत मालव्याने छत्रपती संभाजीनगर क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळच्या सत्रात लकी बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स आणि यंग इलेव्हन यांच्यात सामना सुरु होता. याच सामन्यात यंग इलेव्हन संघाकडून प्रशासक जी. श्रीकांतही खेळत होते. लकी संघाचा कर्णधार इम्रान पटेल याने सामन्याच्या सहाव्या षटकांत दोन चौकारही मारले. मात्र षटक संपल्यानंतर इम्रान पटेल याने गळा आणि हात दुखतोय, मी बाहेर जाऊन औषधाची गोळी घेऊन येतो, असे पंचांना व खेळाडूंना सांगितले.
मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनीही इम्रान पटेलला आरोग्य महत्त्वाचे आहे, तू आरोग्याची काळजी घे व रुग्णालयात तत्काळ जा, असा सल्ला दिला. असाच सल्ला यंग इलेव्हनचा कर्णधार संदीप नागरे यानेही इम्रान पटेलला दिला. मैदान सोडतानाच इम्रान पटेल सीमारेषेजवळ अचानक कोसळला. त्यानंतर सर्वच खेळाडूंनी त्याच्याकडे धाव घेतली. सायंकाळी वाहनांची गर्दी असते. त्यामुळे प्रशासक जी. श्रीकांत यांनी त्यांची गाडी व सोबत पायलट घेऊन इम्रान पटेल याला तात्काळ खासगी रुग्णालयात पाठवले. मात्र, डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केल्यानंतरही त्याचे प्राण वाचू शकले नाहीत.
उल्लेखनीय बाब म्हणजे इम्रान पटेल याने गतवर्षी एपीएल स्पर्धेतही आपला विशेष ठसा उमटवला होता. त्याची ग्रीन गोल्ड सान्या युनायटेडविरुद्धची नाबाद ५२ धावांची खेळी क्रिकेट रसिकांच्या आजही स्मरणात आहे. या खेळीमुळे शक्ती स्ट्रायकर्स संघाने उपांत्य फेरी गाठली होती. शेख हबीबनंतर मैदानातच इम्रान पटेल जाणे ही मनाला चटका लावणारी घटना असल्याचे मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
इम्रान पटेल याचा आझाद कॉलेज पॅसिफिक हॉस्पिटलजवळ कब्रस्थानमध्ये दफनविधी झाला. इम्रान पटेल याच्या पश्चात आई, पत्नी, ३ मुली आणि भावंडे असा परिवार आहे.