क्रिकेटर तरुणाला झालेली मारहाण सीसीटीव्ही कॅमेºयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:20 AM2017-08-15T00:20:57+5:302017-08-15T00:20:57+5:30
किरकोळ कारणावरून मित्रासोबत झालेल्या भांडणानंतर एका क्रिकेटर तरुणाला चार ते पाच गुंडांनी बेदम मारहाण केली. ११ आॅगस्ट रोजी जय टॉवर येथील एका ड्रायव्हिंग स्कूलच्या कार्यालयात ही घटना घडली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : किरकोळ कारणावरून मित्रासोबत झालेल्या भांडणानंतर एका क्रिकेटर तरुणाला चार ते पाच गुंडांनी बेदम मारहाण केली. ११ आॅगस्ट रोजी जय टॉवर येथील एका ड्रायव्हिंग स्कूलच्या कार्यालयात ही घटना घडली. या घटनेत तरुणाच्या कानाचा पडदा फाटला असून, चार दिवसांपासून तो घाटी रुग्णालयात उपचार घेत आहे. ही मारहाण तेथील सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली.
सौरव जाधव असे जखमी तरुणाचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना त्याच्या वडिलांनी सांगितले की, सौरव हा देवगिरी कॉलेजमध्ये बी.सी.एस.चे शिक्षण घेतो. तो चांगला क्रिकेटर असून, त्याला चार दिवसांनंतर श्रीलंकेत क्रिकेट खेळण्यासाठी जायचे आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा कॉलेजमधील काही तरुणांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. नंतर हा वाद आपसात मिटलाही. दरम्यान ११ आॅगस्ट रोजी तो त्याच्या मित्रासह जय टॉवर येथील ड्रायव्हिंग स्कूलमध्ये बसलेला होता. यावेळी चार ते पाच बॉडी बिल्डर गुंड तेथे आले आणि त्यांनी सौरवला मारहाण केली. यावेळी त्यास सोडविण्याचा प्रयत्न करणाºया त्याच्या मित्रालाही त्यांनी मारले. या घटनेत सौरवच्या कानाचा पडदा फाटला. विशेष म्हणजे शहरात गुंडाराज स्टाइल झालेली मारहाण तेथील सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली. याविषयी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून न्याय द्यावा, यासाठी सौरवचे आई-वडील चार दिवसांपासून वेदांतनगर पोलीस ठाण्यात चकरा मारीत आहेत; मात्र पोलीस अधिकारी त्यांची तक्रार नोंदवून घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, त्यांनी याविषयी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यासाठी सोमवारी आयुक्तालयात धाव घेतली होती.
याविषयी सौरवच्या वडिलांनी सदर प्रतिनिधीला सांगितले की, ही घटना घडल्यानंतर आम्ही तक्रार देण्यासाठी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गेलो, तेव्हा दुसºया दिवशी येण्याचे पोलीस निरीक्षक डी.एस. सिनगारे यांनी सांगितले. दुसºया दिवशी गेल्यानंतर त्यांनी तुमच्या मुलाविरुद्धही गुन्हा दाखल होईल, कशाला तक्रार करता, असे सांगितले. आमच्याच मुलाला चार ते पाच जणांनी बेदम मारहाण केल्याचे सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहे. या सीसीटीव्ही कॅमेºयात सौरवने कोणावरही हात उचलला नाही, असे असताना पोलिसांनी आमची तक्रार नोंदवून घेण्याऐवजी आरोपींची बाजू घेतल्याने आश्चर्य वाटते.