फरार कार चालकाविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:02 AM2021-04-15T04:02:22+5:302021-04-15T04:02:22+5:30
वाळूज महानगर : दुचाकीस्वार सुरक्षारक्षकास पाठीमागून जोराची धडक देऊन जखमी करणाऱ्या फरार कार चालकाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा ...
वाळूज महानगर : दुचाकीस्वार सुरक्षारक्षकास पाठीमागून जोराची धडक देऊन जखमी करणाऱ्या फरार कार चालकाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश बुद्दू चव्हाण (५१ रा.तीसगाव) हे ३१ मार्चला सांयकाळी दुचाकी (क्रमांक एमएच २०- बीजे. ९८४३) वर स्वार होऊन घरी चालले होते. सिडको उद्यानाजवळ पांढऱ्या कार क्रमांकाचे चालकाने प्रकाश चव्हाण यांना तुम्ही दिशा सिक्युरिटीचा राजीनामा दिला आहे का, असे विचारताच चव्हाण यांनी राजीनामा न दिल्याचे सांगितले. यानंतर चव्हाण हे दुचाकीवरून घराकडे जात असतांना त्या कारचालकाने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक देऊन फरार झाला. या अपघातात प्रकाश चव्हाण हे जखमी झाले असून अपघातास कारणीभूत कारचालकाविरुध्द त्यांनी तक्रार दिली आहे.
रमजाननिमित्त फळ विक्रीची दुकाने सजली
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात रमजाननिमित्त ठिकठिकाणी फळ व खजूर विक्रीची दुकाने सजली आहे. पवित्र रमजान महिन्याचा आज बुधवारी पहिला रोजा असल्याने पंढरपूर, वाळूज, कमळापूर, जोगेश्वरी, रांजणगाव आदी ठिकाणी विक्रेत्यांनी फळ व खजूर विक्रीची दुकाने थाटली आहे. सोशल डिस्टन्सिंग व मास्क परिधान करणाऱ्यांनाच विक्रेते इफ्तारचे साहित्य वाटप करीत असल्याचे चित्र या परिसरात पहावयास मिळत आहे.
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यात चिंता
वाळूज महानगर : शासनाच्यावतीने बुधवार (दि.१४) रात्री ८ वाजेपासून लॉकडाऊन जाहीर केल्याने वाळूज उद्योगनगरीतील हातावर पोट असणाऱ्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या परिसरात हमाली, बिगारी व मजुरी करणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावला जाणार असल्याने कुटुंबाचे पालन-पोषण कसे करावे याची चिंता अनेकांना सतावत आहे.
मास्क वापरणाऱ्यांची उद्योगनगरीत वाढली संख्या
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत विनामास्क फिरणाऱ्याविरुध्द पोलीस प्रशासनाच्यावतीने गुन्हे दाखल केले जात आहेत. या परिसरात वाळूज व एमआयडीसी वाळूज पोलिसांच्यावतीने मुख्य बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांना पकडून त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाच्या या कारवाईमुळे वाळूज महानगर परिसरात मास्क वापरणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे.
जोगेश्वरीत विजेचा लंपडाव
वाळूज महानगर : जोगेश्वरीत सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. या वसाहतीत बहुतांश गरीब कामगारवर्ग वास्तव्यास असून वीज सतत गायब राहत असल्याने ग्राहकात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. महावितरणकडून वीज बिलाची सक्तीने वसुली केली जात असून वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. मात्र वीजपुरवठा सुरळीत करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने नागरिकात नाराजीचा सूर उमटत आहे.