विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या दाेन शिक्षकांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:02 AM2021-02-14T04:02:01+5:302021-02-14T04:02:01+5:30
कन्नड : गुरू-शिष्याचे नाते समाजात आदर्श नाते आहे. मात्र, या नात्याला काळीमा फासणारी घटना कन्नडमध्ये घडली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीची ...
कन्नड : गुरू-शिष्याचे नाते समाजात आदर्श नाते आहे. मात्र, या नात्याला काळीमा फासणारी घटना कन्नडमध्ये घडली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीची दाेन शिक्षकांनी छेड काढल्याची धक्कादायक घटना शनिवारी समोर आली असून पीडितेच्या तक्रारीवरुन ग्रामीण पोलीस ठाण्यात अनुप राठोड (३०) व संदीप शिखरे (३२) या शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच संबंधित शिक्षक फरार झाले आहे.
कोरोनाच्या सावटानंतर नुकत्याच बंद असलेल्या शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची हजेरी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच कन्नड तालुक्यात शिक्षकांनीच विद्यार्थिनीची काढली असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. प्रयोगशाळा खोलीची साफसफाई करण्याच्या उद्देशाने शुक्रवारी प्राचार्यांसह तीन विद्यार्थिनी वर्गाजवळ पोहोचल्या. खोलीला कुलूप असल्याने प्राचार्य चावी तर अन्य दोन मुली झाडू आणण्यासाठी गेल्या. पीडिता एकटीच प्रयोगशाळेच्या कक्षाजवळ होती. ते पाहून तिला जवळच्या खोलीत बोलावून अनुप राठोड व संदीप शिखरे या दाेन शिक्षकांनी तिची छेड काढली.
या घटनेमुळे पिडीता भेदरलेल्या अवस्थेत त्याठिकाणाहून पळ काढला. तिची आई शेतीकामासाठी तर वडील औरंगाबाद शहरात आले होते. आई-वडील सायंकाळी घरी आल्यानंतर पीडिताने सर्व हकीकत त्यांना सांगितली. त्यानंतर आई वडिलांसह पीडितेने कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे गाठून राठोड व संदीप शिखरे या शिक्षकांविरोधात फिर्याद दिली. शुक्रवारी रात्री उशिरा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच संबंधित दोन्ही शिक्षक फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास पो.नि. सुनील नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप भिवसने करीत आहेत.