सारडांसह संचालकांवर गुन्हा
By Admin | Published: March 25, 2017 10:57 PM2017-03-25T22:57:26+5:302017-03-25T23:01:20+5:30
बीड :जिल्हा बँक अध्यक्ष आदित्य सारडा व संचालक मंडळावर शनिवारी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
बीड : उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने जिल्हा बँकेकडे मुदत ठेवीच्या स्वरूपात ठेवलेले १५ कोटी व त्यावरील ५ कोटी रूपये व्याज असे एकूण २० कोटी रूपये देण्यास विलंब केल्यामुळे अध्यक्ष आदित्य सारडा व संचालक मंडळावर न्यायालयीन आदेशानुसार शनिवारी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
डीसीसी उपाध्यक्ष गोरख धुमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब देशमुख, शाखा व्यवस्थापक धीरज बुंदेले, संचालक साहेबराव थोरवे, दत्तात्रय पवार, सर्जेराव तांदळे, महादेव तोंडे, संगीता सुरेश धस, शीतल दिनकर कदम, सत्यभामा रामकृष्ण बांगर, संध्या दशरथ वनवे, मीना राडकर, रावसाहेब नाटकर, कैलास नलावडे, ऋषीकेश आडसकर, फुलचंद मुंडे, परमेश्वर उजगरे, नितीन ढाकणे, चंद्रकांत शेजूळ, दिनेश परदेशी अशा एकूण २१ जणांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.
उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने जिल्हा बँकेकडे १५ कोटी रूपये मुदत ठेवीच्या स्वरूपात ठेवले होते. त्यावर पाच कोटी रूपये व्याज झाले. एकूण २० कोटी रूपये परत द्यावेत, यासाठी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेतर्फे जिल्हा बँकेकडे पाठपुरावा सुरू होता. मात्र, जिल्हा बँकेने उस्मानाबाद बँकेला दाद दिली नाही.
अखेर जनता सहकारी बँकेचे सर व्यवस्थापक महादेव गायकवाड यांनी कायदेशीर पाऊल उचलले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक निरीक्षक मारूती शेळके हे करीत आहेत. (प्रतिनिधी)