Aurangabad Violence : तीन हजार दंगलखोरांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 06:15 AM2018-05-15T06:15:55+5:302018-05-15T06:16:27+5:30
शुक्रवारी मध्यरात्री उसळलेल्या दंगलीप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यात सुमारे तीन हजार दंगलखोरांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
औैरंगाबाद : शुक्रवारी मध्यरात्री उसळलेल्या दंगलीप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यात सुमारे तीन हजार दंगलखोरांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर अटक केलेल्या २३ जणांना न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावली.
औरंगाबादेत उसळलेल्या जातीय दंगलीत लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून अनेक जण जखमी झाले आहे. शनिवारपासून पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन राबवत संशयीतांची धरपकड सुरू केली आहे. दंगलग्रस्त भागातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रत्यक्षदर्र्शींनी दिलेली माहिती व घटनास्थळावरील पुरावे, यावरून सुमारे तीन हजार दंगलखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दंगलीनंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करण्यात येतील. सोमवारपासून पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. घटनास्थळी असलेले वास्तव व मालमत्ताधारकांनी दिलेल्या बयाणानुसार पंचनामे होतील. त्यानंतर नुकसानीचा अंदाज बांधणारा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. तर दंगलखोरांना रोखण्यास पोलीस कमी पडल्याने शहर धुमसत राहिले, अशी कबुली राज्याचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बीपीन बिहारी यांनी दिली.
>राजकीय नेत्याशी पोलिसांची ‘हातमिळवणी’!
औरंगाबाद शहरात शुक्रवारी रात्री उसळलेल्या जातीय दंगलीत पोलिसांसमक्ष वाहनांची जाळपोळ करण्यात आली. या दंगलीचे चित्रीकरण केलेला एक व्हिडिओ समोर आला असून त्यात एक राजकीय नेता पोलीस अधिकाऱ्याशी हस्तांदोलन करताना दिसत आहे.
दंगलीचे मुख्य केंद्र नवाबपुरा, राजाबाजार चौकात होते. या भागात दोन्हीकडील हजारो युवक जमा झाले होते. पोलिसांनी नवाबपुरा रोडवर असणारा जमाव अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत, गोळीबार करीत पाठीमागे रेटला. पोलिसांचा ताफा नवाबपुरा रोडवरून जिन्सीकडे निघालेला असताना नेहरू पायजमा घातलेला एक युवानेता एका पोलीस अधिकाºयाशी ‘हात’ मिळवणी करताना व्हिडिओत दिसत आहे. या ‘हातमिळवणी’नंतर अवघ्या काही मिनिटांत चार युवक हातात लोखंडी रॉड घेऊन येतात. ही फोडा..ती फोडा अशी आरडाओरड करत गाड्यांची तोडफोड सुरू होते. तोपर्यंत पोलीस नवाबपुरा रोडवरून पुढे गेलेले असतात. मागे हा गोंधळ सुरू होतो.
>दंगेखोरांना पोलिसांचे संरक्षण
पोलीस संरक्षणातच दंगेखोर येतात. पोलीस पुढे निघून गेल्यानंतर मागे निर्मनुष्य रस्त्यावरील गाड्या, दुकाने पेटवून देतात हे या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.
व्हिडिओ बनविणाºयांशी संवाद साधला असता, त्यांनी सांगितले की, दंगेखोर पोलीस संरक्षणातच जाळपोळ करीत असतील, तर आम्ही काय करावे? कोणाकडे जावे? डोळ्यादेखत आमची गाडी पेटविण्यात आली; मात्र आम्ही काहीही करू शकलो नाही, गाडीपेक्षा जीव महत्त्वाचा होता, अशी हतबलताही त्यांनी व्यक्त केली.
>दंगेखोरांना आम्हीच रोखले - खैरे
आमच्यावर जोरदार दगडफेक सुरू होती, दंगेखोरांना रोखण्यासाठी आम्ही धावलो, अन्यथा दंगलखोर गुलमंडी, सराफा, औरंगपुरा आणि पैठणगेटपर्यंतच्या भागात जाळपोळ आणि लुटालूट करण्याच्या तयारीत होते. एवढेच नव्हे तर दंगलखोरांनी केलेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाºयांना आम्हीच रुग्णालयात दाखल केले, असा दावा खा. चंद्रकांत खैरे यांनी केला.
>सत्य बाहेर येईल...
दंगल का घडली, याला जबाबदार कोण, हा पूर्वनियोजित कट होता का या सर्व प्रश्नांची उत्तरे चौकशीत बाहेर येतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
>खैरे यांच्यावर कारवाई करा : विखे
शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे विशिष्ट समाजाची बाजू घेऊन बोलत आहेत. हे आक्षेपार्ह आहे. हिंमत असेल, तर सरकारने खा. खैरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.