मजूर मृत्यूप्रकरणी दोघांवर गुन्हा
By Admin | Published: July 14, 2017 12:03 AM2017-07-14T00:03:05+5:302017-07-14T00:10:36+5:30
हट्टा : तालुक्यातील करंजाळा येथील बोरींग मशीनवरील कामास असलेल्या व्यक्तीचा मृत्यू प्रकरणात गुरूवारी दोन जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
हट्टा : तालुक्यातील करंजाळा येथील बोरींग मशीनवरील कामास असलेल्या व्यक्तीचा मृत्यू प्रकरणात गुरूवारी दोन जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल झाला. मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारी वरून हट्टा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वसमत तालुक्यातील करंजाळा येथील रहिवाशी मधुकर श्रावण जाधव (४०) हा व्यक्ती बोरींग मशीनवर कामास होता. निजामाबाद येथे मशीनसोबत गेला असता तो पडून जखमी झाल्याचे सांगून त्यास नांदेड येथे उपचारासाठी दाखल केले होते. गंभीर जखमी असल्याने डॉक्टरांनी त्यास औरंगाबाद येथे हलवण्याचा सल्ला दिला होता. औरंगाबाद येथे नेम असताना वाटेतच त्याचे मंगळवारी निधन झाले.
या प्रकरणी मयताची पत्नी गंगासागर जाधवने तिच्या पतीचा मृत्यू गाडीवरून पडून झाला नाही तर त्याचा पैशाच्या वादातून खून झाला असल्याची तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून हट्टा पोलिसांनी गणेश रुद्रवास (रा. पुरजळ, ह.मु. परभणी) व विश्वंभर मगर (रा. जवळाबाजार) या दोघांविरोधात कलम ३०२, ३४ भादवि अन्वये गुरूवारी सायंकाळी गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा तपास सपोनि सुनील नाईक करत आहेत. मयताचे शवविच्छेदन हट्टा, वसमत येथे न करता नांदेड येथे करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकाची होती. त्यावरून बुधवारी दिवसभर हट्टा पोलीस ठाण्यात गोंधळ सुरू होता. अखेर रात्री नांदेडला शवविच्छेदन करण्यात आले होते.
घटनाक्रम:- मयत इसम हा ११ रोजी निजामाबाद येथे जखमी झाला. त्यास निजामाबादहून नांदेडला आणले, नांदेडहून जखमी अवस्थेत औरंगाबादला हलवले, रस्त्यात मरण पावल्याने मयतास करंजाळा येथे आणले. तेथून हट्टा येथे मृतदेह आणला. हट्ट्यात शवविच्छेदन न केल्याने पुन्हा नांदेडला शवविच्छेदन करून पुन्हा करंजाळा येथे अंत्यसंस्कार करून १३ रोजी हट्टा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मृत्यूनंतर गुन्हा नोंदवण्यास तीन दिवस लागले हे विशेष.