'आरटीओ'ची फसवणूक करणाऱ्या दोन पीयूसी चालकांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 12:19 PM2021-02-25T12:19:01+5:302021-02-25T12:21:17+5:30
Crime against two PUC operators वाहनांची तपासणी न करता पियूसी सेंटरचालकांशी संगणमत करून आरोपी वाहनमालकांनी फसवणूक केली
औरंगाबाद: आरटीओ कार्यालयात जप्त असलेल्या तीन वाहनांचे बनावट पीयूसी(प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र) देऊन फसवणूक करणाऱ्या दोन पीयूसी सेन्टर आणि तीन वाहनमालकाविरूध्द वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाहन क्रमांक ( एम एच २० सीटी ८२११) चा मालक, ए.एम.के.पी.युसी केंद्रचालक मुजीब खान (मिल कंपाऊंड, बीड बायपास चौक) , प्रवासी बसचा मालक क्रमांक(एम एच २० डीडी ९५५) आणि साई पीयूसी केंद्रचालक कैलास किसन त्रिभुवन कार क्रमांक (एम एच २० बीटी ७९४८)चा मालक , (रा. एचपी ऑटो सेंटर वाळूज)अशी आरोपीची नावे आहेत.
याविषयी पोलिसांनी सांगितले की, वाहतूक नियमाचा भंग केल्याच्या आरोपावरून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आरोपी दोन वाहने जप्त करून आर टी ओ कार्यालयाच्या आवारात जप्त करून ठेवली होती. या वाहनांची पि यू सी तपासणी न करता वाहनमालकांनी पीयूसी सेंटरचालकांशी संगणमत करून वाहनाच बनावटे पीयूसी प्रमाणपत्र तयार केले.
१० मे २०१९ ते ७ ऑक्टोबर २०२० दरम्यान त्यांनी त्यांच्या वाहनांच्या कागदपत्रासोबत आरटीओ कार्यालयात सादर केलेल्या कागदपत्रात बनावट पीयूसी प्रमाणपत्र सादर केल्याचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शेख फैरोज सुभान यांच्या निदर्शनास आले. वाहने जप्त केलेले असतांना वाहनांची तपासणी न करता पि यू सी सेंटरचालकांशी संगणमत करून आरोपी वाहनमालकानी केलेल्या या फसवणूकचा प्रकार लक्षात येताच शेख यांनी रात्री वेदांतनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक शंकर डुकरे हे तपास करीत आहेत.