औरंगाबादमध्ये गुन्हेगारीत झाली घट; आयुक्तांनी आकडेवारी केली जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 11:39 AM2017-12-20T11:39:27+5:302017-12-20T11:45:06+5:30
शहर जसे वाढत होते तसे शहरात गुन्हेगारीदेखील वाढली होती; परंतु गतवर्षीच्या तुलनेत गुन्ह्याचे प्रमाण घटल्याची आकडेवारी पोलीस आयुक्त कार्यालयाने जाहीर केली आहे. यानुसार शहरात गुन्हेगारीत मागील वर्षीच्या तुलनेत घट झाल्याचे स्पष्ट होत आहे.
औरंगाबाद : शहर जसे वाढत होते तसे शहरात गुन्हेगारीदेखील वाढली होती; परंतु गतवर्षीच्या तुलनेत गुन्ह्याचे प्रमाण घटल्याची आकडेवारी पोलीस आयुक्त कार्यालयाने जाहीर केली आहे. यानुसार शहरात गुन्हेगारीत मागील वर्षीच्या तुलनेत घट झाल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिसांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तयार केलेल्या उपायोजनांचा फायदा होऊन तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगारीचा आलेख खालावल्याचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी गुन्हेगारी नियंत्रणावर म्हटले आहे.
गतवर्षी दरोड्याच्या १८ घटना घडल्या होत्या. यंदा ७ गुन्हे दाखल आणि ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. ४३ टक्के गुन्हे घटले आहेत. जबरी चोरीच्या २९५ घटना असून, यंदा १४१ प्रकार समोर आले असून, ११५ उघडकीस आले आहेत. १५४ ने गुन्हे घटले आहेत. सीसीटीव्ही, जीपीएस यंत्रणा लावल्याने संवेदनशील भागात अधिक परिणामकारक ठरले आहे. घरफोडीच्या ३२७ घटनांची नोंद होती. यंदा १५२ प्रकार घडले आहेत. १७५ ने घरफोडीचे प्रकार घटले आहे.
सर्व घटनांचा विचार केला असता ८५३ गुन्ह्यांची घट झाली असून, गतवर्षी ते २,३५६ नोंद होती. यंदा १,४९३ पर्यंत नियंत्रण आणले आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष पोलीस अधिका-यांचीदेखील मोठी मदत होत आहे. खुनाच्या गुन्ह्यातदेखील ४५ टक्के घट असून, दुखापतीच्या प्रकारात ११ टक्के घट झाली आहे. सरकारी नोकरावर हल्ल्याचे प्रकार २६ टक्क्यांनी घटले असून, महिलावरील अत्याचारांत ७, तर बलात्काराच्या घटनांत १३ टक्के घट झाली आहे. मंगळसूत्र चोरी ५२ टक्क्यांनी कमी झाली आहे. सीसीटीव्ही व पोलिसांच्या गस्तीचा फायदा झाला आहे. अजूनही या गुन्ह्यात अधिक लक्ष घालण्यासाठी उपायोजना आखल्या जाणार आहेत, असे पोलीस आयुक्त यशस्वी यादव, सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी कळविले.